पिंपरी : लाचखोरीप्रकरणी पुणे जिल्ह्यात आज (ता. 8 डिसेंबर) दोन ठिकाणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यातील एक कारवाई ही मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथे, तर दुसरी कारवाई ही शिरूर तालुक्यात झाली आहे.
वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधकाला (सब रजिस्टार) साडेसात हजार रुपयांची लाच घेताना आज त्याच्याच कार्यालयात पकडण्यात आले. सुमारे पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याच्या कारणावरून शिरूरचा भूकरमापक आणि त्याच्या शिपायाविरुद्ध लाचखोरीची दुसरी कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली आहे.
जितेंद्र बडगुजर (वय 50) असे वडगाव मावळमधील लाचखोर सब रजिस्टारचे नाव आहे. एका वकिलाच्या अशिलाच्या नोंदवलेल्या 15 दस्तांवर नोंदणीचा सही व शिक्का देण्यासाठी लाच घेताना बडगुजरला एसीबीने पकडले. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुसऱ्या लाचखोरीच्या कारवाईत पन्नास हजार रुपयांची लाच मागितली; म्हणून शिरूर भूमी अभिलेख कार्यालयाचे भूकरमापक रवींद्र शेळके (वय 29) आणि शिपाई दीपक ताजणे (वय 40) या दोघांविरुद्ध पुणे एसीबी युनिटने लाचखोरीचा गुन्हा शिरूर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. जमीन नोंदणीचे शासकीय शुल्क भरूनही ती करून देण्यासाठी शेळके व ताजणे या दोघांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती.

