तुम्ही नोटिसा काढा, मी तुमच्या भ्रष्टाचाराच्या फायली ओपन करतो 

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली बाहेर काढत सहा महिन्यांत रिझल्ट देऊ.
तुम्ही नोटिसा काढा, मी तुमच्या भ्रष्टाचाराच्या फायली ओपन करतो 
You give notices, I open your corruption files: Sunil Shelke challenges opponents

लोणावळा (जि. पुणे) : "जनतेचा पैसा कोणालाही चुकत नाही, लोणावळा नगरपालिकेत ज्यांनी उपद्‌व्याप केलेत, त्यांना मी सोडणार नाही, असा इशारा देत सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली बाहेर काढत सहा महिन्यांत रिझल्ट देऊ,'' असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांना लोणावळ्यात दिला. 

लोणावळा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आमदार शेळके बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, नगरसेवक राजू बच्चे, लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड, नंदूशेठ वाळंज, गणेश खांडगे, सुवर्णा राऊत, मंजू वाघ, विठ्ठलराव शिंदे, राजू बोराटी, भूषण पाळेकर, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते. 

"जर माझ्या हातात हात घालून काम करायचे नाही, तर मग नगरसेवक तो कोणत्याही पक्षाचा असो, त्यांची कामे, ठराव घ्यायचे नसतील, तर लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी करू, असा इशारा आमदार शेळके यांनी या वेळी दिला. लोणावळ्यात कोण काय काय करतंय, सगळं माहिती आहे. खूप सहन केले. मात्र, यापुढे मनमानी कारभार, दडपशाही, हुकुमशाही चालणार नाही, असे शेळके म्हणाले. 

"टपरीधारक, व्यापाऱ्यांना अतिक्रमणांच्या नोटिसा बजावण्यात आल्या, जो विरोध करतो, त्याला नोटिसा बजावण्यात येतात, तुम्ही नोटिसा काढा, मी तुमच्या भ्रष्टाचाराच्या फायली ओपन करतो,'' असा थेट इशारा आमदार शेळके यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. 

लोणावळ्याचा विकास साधायचा असेल, तर राष्ट्रवादीच्या हाती नगरपालिकेच्या किल्ल्या पाहिजेत, यासाठी सर्व सेलच्या कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर एकजुटीने काम करत संघटना मजबूत करण्याची गरज जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केली. 

मेळाव्यात मुरलीधर जाधव, ऋषी कांकरिया, रज्जाक पठाण, अमन पठाण, नासीर तांबोळे, फिरोज पठाण, नुरमहंमद शेख, विकास गायकवाड आदींसह खंडाळ्यातील बॅटरी हील येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांनी प्रास्तविक केले. बाळासाहेब पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. भूषण पाळेकर यांनी आभार मानले. 


नगराध्यक्ष, नगरसेवकांचा निषेध 

आमदार शेळक म्हणाले, रुग्णालयासाठी 41 कोटी, पुलांसाठी साडेतीन कोटी, तर आयटीआयसाठी दोन कोटींचा निधी आत्तापर्यंत दिला आहे. सर्वसाधारण सभेत प्रत्येक नगरसेवकांची कामे घ्या, ठरावांची मंजुरी घ्या, असे स्वतः आवाहन केले. जिल्हा नियोजन समिती, नगरोत्थान किंवा ठोक तरतुदींच्या माध्यमातून आतापर्यंत दहा कोटींचा निधी सत्ताधाऱ्यांनी ठराव न घेता जाणीवपूर्वक डावलला, असा आरोप करत आमदार शेळके यांनी सत्ताधारी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा निषेध केला. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in