पिंपरी भाजपला घरचा आहेर; कोविड साहित्य खरेदीत गैरव्यवहाराचा नगरसेवकाचा आरोप  - pimpri chinchwad BJP corporator alleges corruption in procurement of Kovid Center materials | Politics Marathi News - Sarkarnama

पिंपरी भाजपला घरचा आहेर; कोविड साहित्य खरेदीत गैरव्यवहाराचा नगरसेवकाचा आरोप 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

या कंत्राटदाराची पत्नी महापालिकेची कर्मचारी आहे.  

पिंपरी : श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने 110 रुपयांचे बेडशिट 430 रुपयांना, 138 रुपयांची चादर 377 रुपये, तर चाळीस रुपयांची उशी तीनशे रुपयांना खरेदी केली आहे. उशीचे 15 रुपयांचे कव्हर 62 रुपयांना आणि दहा रुपयांचा नॅपकीन 45 रुपयांना विकत घेतला आहे, तशी तक्रार महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी करीत घरचा आहेर दिला आहे. 

एका कोविड सेंटरसाठीच्या खरेदीत एक कोटी रुपयांचा गफला झाला आहे. त्याला महापालिकेचा एक अधिकारी, ठेकेदार व महाटेक्‍स्टचा एक एजंट जबाबदार असल्याचा आरोप वाघेरे यांनी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.

वैद्यकीय विभागामार्फत सुरू असलेला कोविडचा हा अनागोंदी कारभार थांबवून डॉ. पवन साळवे आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

याबाबत वाघेरे म्हणाले की, कोविडचे रुग्ण सध्या कमी असल्याने खाटा रिकाम्या आहेत, त्यामुळे गरज नसताना ऑटो क्‍लस्टर कोविड सेंटर मात्र सुरूच आहे. तेथे काही कोटी रुपये नाहक खर्च ठेकेदारावर महापालिका करत आहे.

संबंधित ठेकेदार अपात्र असतानाही त्याला हे काम देण्यात आले. जेवण पुरविण्याचा कोणताही परवाना नसतानाही जेवणाचासुद्धा ठेका या कंत्राटदारालाच देण्यात आलेला आहे. ही पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक असून त्याप्रकरणी पालिकेचे अधिकारी आणि या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

या कंत्राटदाराची पत्नी महापालिकेची कर्मचारी आहे. त्या ज्या वैद्यकीय विभागात कामाला आहेत, त्या विभागानेच हे टेंडर काढले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख