चंद्रकांत पाटलांना निवडणुकीपुरतीच पदवीधरांची आठवण होते  - NCP's Sanjog Waghere Patil criticizes Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

चंद्रकांत पाटलांना निवडणुकीपुरतीच पदवीधरांची आठवण होते 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

खोट बोलण्यात आणि टीका करण्यात माहीर असलेले पाटील हे राज्यात भाजपचे सरकार असताना याच पदवीधरांच्या आशीर्वादामुळे पाच वर्षे मंत्री होते

पिंपरी : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या गेल्या दोन टर्ममध्ये आमदार चंद्रकांत पाटलांना मतदारसंघातील पदवीधरांचा एकही प्रश्न सोडविला नाही. राज्यात सरकार असतानाही पदवीधरांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाटलांना आता निवडणुकीमध्येच त्यांची आठवण झाली आहे. त्यामुळे पाटलांची महाविकास आघाडी सरकारवरील टीका म्हणजे "सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' अशी आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी आज (ता. 21 नोव्हेंबर) चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शुक्रवारी (ता. 20 नोव्हेंबर) पिंपरी-चिंचवड भेटीत राज्य सरकारचा उल्लेख करंटा असा करताना महाविकास आघाडीमुळे पदवीधरांचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. या टीकेचा समाचार घेताना गेल्या अकरा वर्षांत पाटलांनी पदवीधरांसाठी काय केले, हे त्यांनी अगोदर जाहीर करावे, असे आव्हान वाघेरे यांनी दिले. 

केवळ खोट बोलण्यात आणि टीका करण्यात माहीर असलेले पाटील हे राज्यात भाजपचे सरकार असताना याच पदवीधरांच्या आशीर्वादामुळे पाच वर्षे मंत्री होते. मात्र, आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात पदवीधरांसाठी काहीही न करणाऱ्या पाटलांना आता पदवीधरांचे प्रश्न आठवू लागले आहेत. आपले अपयश लपविण्यासाठी ते महाविकास आघाडीवर टीका करत असून त्यांच्या टीकेला आता कोणीही गांभीर्याने घेत नाही. येत्या 1 डिसेंबर रोजी पदवीधर आपला रोष मतपेटीतून व्यक्त करतील आणि पाटील व त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला जागा दाखवून देतील, असेही वाघेरे यांनी म्हटले आहे. 

महाविकास आघाडीने गेल्या वर्षभरात जनतेसाठी घेतलेल्या निर्णयामुळे पदवीधर महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड यांचा विजय निश्‍चित होईल, असा विश्वासही वाघेरे यांनी या वेळी व्यक्त केला. 

काय म्हणाले होते चंद्रकांतदादा? 

"जनतेला वेठीस धरलेल्या राज्यातील करंट्या महाविकास आघाडी सरकारला पदवीधर आणि शिक्षक मतदार धडा शिकवतील," असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केला होता. पदवीधरांचे नुकसान केलेल्या या सरकारविरुद्ध हे पदवीधर आणि शिक्षक मतदार या वेळी रोष व्यक्त करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता. "करंट्या राज्य सरकारमुळे पदवीधरांचे जे नुकसान झाले आहे,' असे ते म्हणाले होते. 

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ पाटील यांनी शहराचा दौरा केला होता. सात मोठ्या शैक्षणिक संस्थांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे आदी या दौऱ्यात सहभागी झाले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख