पिंपरी: लॉकडाऊन शिथिल होताच पिंपरी चिंचवडमध्ये चोरीचे गुन्हे अचानक वाढले आहेत. त्यात चोर आता कशाची चोरी करतील याचा सुद्धा भरवसा राहिला नाही. कारण शहरात महापालिकेचे फिरते शौचालयच चक्क चोरीस गेले आहे.
याबाबत निगडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वच्छ शहर स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिका सहभागी आहे. या स्पर्धेचा एक निकष म्हणजे शहर हागणदारीमुक्त होण्याची गरज आहे. त्यासाठी शहरात चाळीस ठिकाणी त्यातही सार्वजनिक शौचालय नसलेल्या झोपडपट्ट्यांत फिरती शौचालये ठेवण्यात आलेली आहेत. त्यापैकीच लाखभर किमतीचे निगडीच्या रेड झोनमध्ये असलेले हे शौचालय ३ तारखेला चोरीस गेले.मात्र, त्याबाबत चार दिवसानंतर काल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पालिका आरोग्य निरीक्षक महेश आढाव यांनी त्याबद्दल फिर्याद दिली आहे. दरम्यान, याबाबत आजपर्यंत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहितीच नसल्याचे आज दिसून आले.
लॉकडाऊन शिथिल होताच शहरातील चोर सक्रिय झाले आहेत. दररोजचे गुन्हे वाढले आहेत.त्यात चोरीचे गुन्हे सर्वाधिक आहेत. काल नऊ,तर परवा पाच चोरीचे गुन्हे दाखल झालेत. त्याजोडीने गेल्या दोन दिवसात दोन घरफोडी व दोन जबरी चोरीच्या घटनाही घडल्या आहेत.
Edited By - Amit Golwalkar

