पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा वादग्रस्त पीआयना दणका; बदलीत साईड पोस्टिंग 

बदल्या करताना त्यांनी राजकीय दबाव झुगारून वशिल्याच्या तट्टूंना दणका दिला आहे.
Controversial police inspectors transfers by Commissioner Krishnaprakash
Controversial police inspectors transfers by Commissioner Krishnaprakash

पिंपरी : वसुलीचा आरोप झालेले, मोक्‍याच्या जागी ठाण मांडून बसलेले आणि अवैध धंदे आढळलेल्या पोलिस ठाण्यांचे प्रमुख अशा पोलिस निरीक्षक तथा पीआयची पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी शुक्रवारी (ता. 13 नोव्हेंबर) उचलबांगडी केली. वादग्रस्त पीआयना त्यांनी साइड ब्रॅंचला टाकले आहे. 

कृष्णप्रकाश शहरात आयुक्‍त म्हणून आल्यानंतर त्यांनी केलेल्या या पहिल्याच बदल्या आहेत. त्या करताना त्यांनी राजकीय दबाव झुगारून वशिल्याच्या तट्टूंना दणका दिला आहे. बदल्या करण्यात आलेल्यांनी तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे, असा आदेशही त्यांनी बजावला आहे. 

अल्ट्रामॅन हा अत्यंत खडतर असा जागतिक किताब पटकावणारे देशाच्या नागरी सेवेतील आणि वर्दीतील पहिले अधिकारी असलेले कृष्णप्रकाश हे प्रामाणिक आणि तडफदार अधिकारी म्हणून ओळखले जातात. 

पिंपरी-चिंचवडचे तिसरे आयुक्त म्हणून नियुक्ती होताच त्यांनी प्रथम कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले होते. ते करतानाच अवैध धंद्याविरुद्ध मोहीमही त्यांनी उघडली होती. त्यासाठी त्यांनी पोलिस ठाणे प्रमुखांना आपापल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी अवधीही दिला होता. त्याला न जुमानता काही ठिकाणी मटका, जुगार आदी बेकायदेशीर धंदे सुरुच होते. ते गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागामार्फत कारवाई करून त्यांनी बंद केले होते. 

ही कारवाई झालेल्या पोलिस ठाण्याच्या पीआयची आता उचलबांगडी केली गेली आहे. तर, महिन्याला हप्ता गोळा करण्याच्या आरोप झालेल्या गुन्हे शाखेच्या पीआयचीही वाहतूक विभाग या दुय्यम ठिकाणी त्यांनी बदली केली आहे. बदलीवर शहरात आलेल्या व नियंत्रण कक्षाशी संलग्न केलेल्यांनाही त्यांनी नवी पोस्टिंग दिली आहे. 

वसुलीचे हे पत्र सोशल मीडियात गाजले होते 

खंडणी व दरोडा पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचे पत्र सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. अस्पत हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर खंडणी व दरोडा पथकाच्या माध्यमातून पैशाची वसुली करत होते. पोलिस नाईक नितीन लोखंडे यांच्यासह एक हवालदार हे अस्पत यांच्या सांगण्यावरून अवैध धंदे, जमिनीचा ताबा घेणे, अशा प्रकरणांमधून दरमहा चार कोटी रूपये जमा करून सुधीर अस्पत यांना देत असत, असे पत्रात नमूद केले होते. 

हे पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्तांमार्फत या पत्राची चौकशी करण्यात आली. सध्या सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे. यामुळे अस्पत हे चर्चेत आले. अखेर अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अस्पत यांची भोसरी वाहतूक विभागात बदली करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com