मला सेलिब्रेटी तसेच नेताही व्हायचे नाही : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश 

झिरो टॉलरन्स या मोहिमेअंतर्गत वर्षभरात कृष्ण प्रकाश यांनी बहूतांश पिंपरी-चिंचवड अवैध धंदेमुक्त केले आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
मला सेलिब्रेटी तसेच नेताही व्हायचे नाही : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश 
C.P Krishna Prakash

पिंपरीः "मला सेलिब्रेटी व्हायचे नाही. तसेच, नेताही नाही. चांगले काम केले, की प्रसिद्धी मिळतेच," आपली लोकप्रियता व प्रसिद्धीमागील गूढ पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (Police Commissioner), यांनी सोमवारी (ता. ६) उलगडले. "मै कोई बात करता हू उसपे विश्वास मत करो, मगर ये बात आपके बुद्धी, मन को सही लगे तो ही विश्वास करो," या गौतम बुद्धांच्या उक्तीप्रमाणे मी वागतो आहे, असे ते म्हणाले.

झिरो टॉलरन्स या मोहिमेअंतर्गत वर्षभरात कृष्णप्रकाश यांनी बहूतांश पिंपरी-चिंचवड अवैध धंदेमुक्त केले आहे. यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. `आयर्न मॅन` व `अल्ट्रा मॅन` असलेले कृष्णप्रकाश दबंग अधिकारी म्हणूण ते ओळखले जातात. गेल्यावर्षी ते ५ सप्टेंबर रोजी पोलिस आयुक्त म्हणून शहरात रुजू झाले. वर्षभरातच त्यांनी शहराला शिस्त लावली. कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवली. त्यामुळे त्यांच्या या वर्षपूर्तीनिमित्त त्यांचा नागरी सत्कार शहराच्या प्रथम नागरिक माई ऊर्फ उषा ढोरे यांच्या हस्ते काल (ता.६) चिंचवडमध्ये करण्यात आला.

यावेळी त्यांच्या भाषणातून त्यांचे वाचन दिसत होते. असा सत्कार झालेले ते शहराचे पहिलेच पोलिस आय़ुक्त आहेत. सर्व पक्ष आणि मानिनी महिला मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महापौरांनी आयुक्तांचा शाल, पुष्पगुच्छ आणि पगडी देऊन सन्मानित केले. खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विलास लांडे, आदी यावेळी उपस्थित होते.


"हा तुम्हा सर्वांचा सत्कार आहे," असे सत्काराला उत्तर देतांना कृष्ण प्रकाश म्हणाले, समाजकंटकांचे निर्दालन करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्या कर्तव्याचे मी पालन करतो. त्यासाठी सत्य शोधता - शोधता सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, सामाजिक संस्था, संघटना, बातमीदार आणि समाजातील जबाबदार नागरीकांचे मी जाळे विणले. त्या माध्यमांतून माहिती मिळत गेली आणि त्यानुसार मी काम करीत गेलो. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये मला चांगले काम करता आले.

वर्षभरात चार हजार सातशे नागरीकांना मी भेटलो असल्याने आता मला माणूस ओळखता येतो, असे ते म्हणाले. लोकशाही आणि लोककल्याणकारी राज्यामध्ये पोलिस प्रशासन दबाव टाकणारी किंवा `लगान` वसूल करणारी यंत्रणा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र हे पुण्यापेक्षा मोठे असले, तरी येथील कर्मचारी संख्या कमी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.   

कृष्णप्रकाश यांनी मागील वर्षभरात ज्या धडाडीने काम केले, त्यामुळे शहरातील महिलांना दिलासा मिळाल्याचे महापौर म्हणाल्या. शहरातील जुगार अड्डे बंद झाल्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. "दहिहंडीच्या दिवशी जन्मलेल्या आयुक्तांचे नावाप्रमाणे काम सुरु आहे," या शब्दांत त्यांनी कृष्ण प्रकाश यांचे कौतूक केले. गुन्हेगारांना कधीकधी पोलिस खात्यातून पाठबळ मिळते. त्याला कृष्णप्रकाश यांनी पायबंद घातला. त्यांनी केलेले काम पाहून यानंतर येणा-या अधिका-यांना आणखी चांगले काम करावे लागेल, असे खासदार बारणे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in