पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश अजितदादांना म्हणाले, "ते जरा लवकर होईल'  - Ajit Pawar distributes smart watches and bicycles to Pimpri Chinchwad police | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश अजितदादांना म्हणाले, "ते जरा लवकर होईल' 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

त्यात कुणाचा हस्तक्षेपही होणार नाही.

 पिंपरी : कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालू नका. जो चुकीचे वागत असेल, तर त्याच्यावर कारवाई करायला अजिबात मागेपुढे पाहू नका, अशी कारवाईची मोकळीक पोलिसांना देताना त्यात कुणाचा हस्तक्षेपही होणार नाही, याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये दिली. शहर पोलिसांना स्मार्ट वॉच व सायकल वाटप सोहळ्यात ते बोलत होते. 

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पोलिसांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांना स्मार्ट वॉच आणि सायकली वाटपाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते ठेवला होता. 

पोलिसांचे मनोबल खच्ची करणाऱ्या पुणे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर (चोरांना पाहून सशस्त्र पोलिस पळाल्याची) त्यांचे मनोधैर्य वाढविणारे भाषण उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी केले आणि त्यांना कारवाईचा फ्री हॅंड दिला. गुंडांचा बंदोबस्त करा, नायनाट करा, अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यासाठी सुविधा दिल्या पाहिजेत, अन्यथा ही अपेक्षा चुकीची ठरेल, असे ते म्हणाले. 

पोलिसांच्या कोरोनातील कामगिरीचे कौतुक करताना या कामाची इतिहासात नोंद होईल, असे ते म्हणाले. स्मार्ट सिटीतील स्मार्ट पोलिसांना स्मार्ट वॉच मिळाल्याने आता त्यांनी गुन्हेगारांवर स्मार्ट वॉच ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

पोलिसांना स्मार्ट करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राज्यात आघाडी घेतल्याबद्दल त्यांनी पोलिस आयुक्तांचे कौतुक केले. त्याचवेळी चोराला पाहून पोलिस पळाल्याची पुण्यातील घटना केविलवाणी असल्याचे त्यांनी सांगितले. चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या मनोबलावर अशा घटनांचा विपरित परिणाम होत असल्याने त्यांची पुनरावृत्ती होणार नाही, हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पहावे, असे त्यांनी सुनावले. 

चांगल्या कामाची सुरवात सकाळच्या प्रसन्न वातावरवणात केली, तर चांगले वाटतं. त्यामुळे हा कार्यक्रम सकाळी नऊला ठेवला. तो आठ वाजताही करण्याची तयारी होती. पण, पोलिस आयुक्तच म्हटले की, ते जरा लवकर होईल, म्हणून नऊची वेळ ठरवली, असे अजितदादादांनी आपण सकाळीच घेत असलेल्या कार्यक्रमामागील गुपित या वेळी उघड केले. त्याला उपस्थितांनी दाद दिली. 

पोलिसांचे जीवन स्मार्ट वॉचमुळे खऱ्या अर्थाने स्मार्ट होणार असले, तरी त्याद्वारे ते त्यांचे लोकेशन, ते गस्तीवर आहेत की नाही हे वरिष्ठांना कळणार आहे, ही खरी यामागील गोम आयुक्तांनी मात्र सांगितली नाही, असे ते म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख