नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक लवकरच जाहीर होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपला रोखण्यासाठी महाविकासआघाडीने कंबर कसली असली तरी जागावाटपावरून आतापासूनच नाराजी सुरू झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेकडे अधिक जागांची मागणी केल्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे.
नवी मुंबई महापालिकेतील एकूण 111 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 40 तर काँग्रेसने 32 जागांची मागणी केली आहे.सेना अधिक जागा देण्यास स्पष्ट नकार देत आहे. शिवसेनेला 70 पेक्षा अधिक जागा हव्या आहेत. शिवसेनेच्या नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे ,खासदार राजन विचारे विजय नहाटा असे विविध पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस-राष्ट्रवादीला अधिक जागा देण्यास शिवसेनेने नकार दिला आहे त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढावे, अशी आक्रमक भूमिका या बैठकीमध्ये घेतली गेल्याचे सांगण्यात येते
काँग्रेसमध्ये अनिल कौशिक, रमाकांत म्हात्रे, संतोष शेट्टी हे आपल्या घरातच तिकीट मागत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याच घरातील मंडळींना पुढे केले तर कार्यकर्त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणाचा कुणाला ताळमेळ नसल्यामुळे तेथे नवेच संकट निर्माण झाले आहे. आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड असा हा संघर्ष आहे. नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे आहे. शिंदे यांच्याकडून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना नवी मुंबईत बोलावले जात नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शशिकांत शिंदे यांचा एक गट दुसरा गट जितेंद्र आव्हाड असा नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट सक्रिय असल्यामुळे कार्यकर्ते नेमकी कोणाच्या ऐकायचा असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाला आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या क्लुप्त्या करू लागले आहेत. यातूनच मिसळ पे चर्चा हा कार्यक्रम नेरुळ मध्ये रंगला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी तर्रीदार मिसळ वर ताव तर मारलाच पण निवडणुकीसाठी वातावरणनिर्मिती केली.

