महिलांच्या लोकल प्रवासाबाबत काँग्रेस -भाजप मध्ये खडाखडी - Congress-BJP quarrels over women's local travel | Politics Marathi News - Sarkarnama

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत काँग्रेस -भाजप मध्ये खडाखडी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

मुंबईत महिलांच्या उपनगरी गाड्यांमधील प्रवासाबाबत राज्य सरकारला सहकार्य करू नये, यासाठी भाजप नेते वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत आहेत, असा आरोप काँग्रेसतर्फे आज करण्यात आला.

मुंबई  : मुंबईत महिलांच्या उपनगरी गाड्यांमधील प्रवासाबाबत राज्य सरकारला सहकार्य करू नये, यासाठी भाजप नेते वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत आहेत, असा आरोप काँग्रेसतर्फे आज करण्यात आला. तर दुपारी 11 ते 3 व संध्याकाळी 7 नंतर ही उपनगरी रेल्वे प्रवासाची वेळ राज्य सरकारने महिलांना पिकनिकसाठी ठरवून दिली का, असा टोला भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी लगावला आहे. 

मुंबईत महिलांच्या उपनगरी लोकलप्रवासाबाबत आजही भाजप व अन्य पक्षीय नेत्यांमध्ये खडाखडी सुरुच राहिली. महिलांना प्रवासासाठी राज्य सरकारने परवानगी देऊनही रेल्वे व्यवस्थापन वेळकाढूपणा करीत आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते व सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला. तर रेल्वेप्रवासासाठी महिलांना राज्य सरकारने दिलेली दुपारी 11 ते 3 व संध्याकाळी 7 नंतर ही वेळ ही नोकरदार महिलांना अजिबात उपयोगाची नाही. मग त्यांनी फक्त पिकनिकला जावे यासाठी सरकारने ही वेळ ठरवून दिली आहे का, असा प्रश्न गोपाळ शेट्टी यांनी विचारला. 

महिलांना लोकल प्रवासाला संमती देण्यासाठी रेल्वे व राज्य शासनाच्या सप्टेंबर मध्ये दोन व 9 आणि 13 ऑक्टोबरला बैठका झाल्या. 17 ऑक्टोबपासूम महिलांना वरील वेळात संमती द्यावी असे ठरले, पण ऐनवेळी 16 ऑक्टोबरला रेल्वेने हात वर केले. चार बैठका घेऊन निर्णय झाल्यानंतर रेल्वे व्यवस्थापनाला रेल्वे बोर्डाच्या परवानगीची गरज का भासावी ? आधीच त्यांनी याविषयावर रेल्वे बोर्डाशी चर्चा का केली नाही ? याची उत्तरे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी द्यावी, असे सावंत म्हणाले. 

राज्य सरकारच्या या निर्णयामागे आर्थिक कारणही आहे. अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन बाजारामुळे सध्या छोट्या व्यापाऱ्यांचा धंदा बसला आहे. महिला घराबाहेर पडल्या तर या छोट्या दुकानातील खरेदीला चालना मिळेल. तसेच सध्या महिलांना बाहेर जाण्यासाठी टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. जे सामान्य महिलांना आर्थिक व सुरक्षेच्या दृष्टीने परवडणारे नाही. तसेच यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्र्नही उपस्थित होत आहे. हे लक्षात घेऊन महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली होती, असेही सावंत यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख