अंबरनाथ पालिकेच्या कर निरीक्षकाला लाच घेताना अटक  - Ambernath Municipal Tax inspector areested for taking bribe  | Politics Marathi News - Sarkarnama

अंबरनाथ पालिकेच्या कर निरीक्षकाला लाच घेताना अटक 

अजय दुधाणे
बुधवार, 23 डिसेंबर 2020

 देवसिंग पाटील असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्याकडून 5 हजार 600 रुपयांची घेतलेली लाच पथकाने हस्तगत केली आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या कर विभागातील कर निरीक्षकाला अँटी करप्शन विभागाच्या पथकाने सापळा रचून काल सायंकाळच्या सुमारास अटक केली आहे.  देवसिंग पाटील असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्याकडून 5 हजार 600 रुपयांची घेतलेली लाच पथकाने हस्तगत केली आहे. याघटनेमुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान देवसिंग पाटील हा अंबरनाथ पालिकेचे लिपिक असून त्यांच्याकडे कर विभागाच्या निरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

तक्रारदाराच्या अंबरनाथ येथील घराला  टॅक्स लावण्यासाठी त्याने लाच  मागितली होती. तडजोडी अंती 5 हजार 600 रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने याबाबत ठाणे अँटीकरप्शन विभागाकडे तक्रार केल्यानंतर आज अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यालयात सापळा रचत त्याला लाच स्वीकारताना  रंगेहाथ अटक केली. लाचखोर  पाटील याच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात लाच खोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अधिक तपास ठाणे लाचलुचपत विभागाचे अधिकारी करीत आहेत.

संबंधित लेख