आर. आर. पाटील यांचे भाकित खरे ठरले... कपिल पाटील मंत्री झाले

सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास...
Kapil Patil oath
Kapil Patil oath

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात ठसा उमटविलेले भाजपाचे खासदार कपिल मोरेश्वर पाटील (Kapil Patil) यांच्या रुपाने ठाणे जिल्ह्याला प्रथमच केंद्रात राज्यमंत्रीपदावर वर्णी लागली आहे. खासदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीने कपिल पाटील यांना बहुमान मिळाला. कपिल पाटील यांच्याकडे गेल्यानंतर रखडलेल्या प्रश्नावर काहीतरी मार्ग निघेल, अशी आशा ग्रामस्थांना असते. त्यातूनच त्यांच्या ठाणे जिल्ह्यातील लोकप्रियतेत वाढ होत गेली. ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री अशी त्यांची वाटचाल राहिली आहे. तसेच ठाणे-रायगड जिल्ह्यातील बहूसंख्य आगरी समाजातील ते पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत. (Kapil Patil includer in Modi Govt as statr minister) 

भिवंडी तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात कपिल पाटील यांचा जन्म झाला. त्यांनी कला शाखेत पदवी मिळविली. अन्, नागरीकरणाच्या दृष्टीकोनातून व्यवसाय सुरू केला. वडील मोरेश्वर पाटील, आई मणिबाई यांच्या आशिर्वादाने १९८८ मध्ये प्रथमच दिवे अंजूर ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. व्यवसायातून राजकारणात उडी घेताना, त्यांना मोठा भाऊ दिवंगत पुरुषोत्तम यांचा सक्रीय पाठिंबा मिळाला. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात मागे वळून पाहिले नाही. १९९२ मध्ये भिवंडी पंचायत समितीचे सदस्यत्व, १९९७ मध्ये सभापतीपद, २००२ मध्ये जिल्हा परिषद सदस्यत्व, जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापतीपद, उपाध्यक्षपद आणि शेवटी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अशी त्यांची चढती कमान होती. या काळात त्यांनी ग्रामविकास विभागाचा सखोल अभ्यास केला.

प्रत्येक शासकीय योजनेतील अटी, तरतूदी लक्षात घेत त्या योजना परिणामकारकपणे राबविल्या. इंग्रजी शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्रात प्रथमच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी नर्सरी स्कूल सुरू झाल्या. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ठाणे जिल्हा परिषदेने यशवंत पंचायत राज अभियानात राज्य सलग दोन वेळा अव्वल क्रमांक पटकावला होता. ग्रामीण भागावर ठसा उमटवित असतानाच, कपिल पाटील यांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. बॅंकेच्या योजना बचत गट व शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याबरोबरच सहकार सोसायट्यांमध्ये बॅंकेचे जाळे विणले. या कार्याबरोबरच बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे संचालक, राज्य विकास परिषदेचे सदस्य, राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या समितीचे चेअरमनपद आदी पदे भूषविली. तर भाजपाच्या स्तरावर ठाणे-पालघर विभागीय अध्यक्षपद आणि प्रदेश स्तरावर उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. या काळात ठाणे व पालघर जिल्ह्यात भाजपाच्या पक्षविस्तारातही त्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्याच्या २०१० च्या दशकातील राजकीय वर्तुळात कपिल पाटील यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यामुळेच नव्याने पुनर्रचित भिवंडी लोकसभा मतदारसंघात संभाव्य खासदार म्हणून कपिल पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, ती त्यांची संधी हुकली. परंतु, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ च्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी भिवंडी जिंकून इतिहास घडविला.

लोकसभेतील अभ्यासपूर्ण भाषणे, मतदारसंघाबरोबरच देशभरातील विविध मुद्दयांकडे वेधलेले लक्ष, संसदीय समितीवर केलेली कामगिरी आदींमुळे त्यांना दुसऱ्या टर्ममध्ये भाजपा पक्ष प्रतोदपदाची जबाबदारी दिली गेली. अन्, आता दोन वर्षानंतर केंद्रीय राज्यमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. खा. पाटील यांचा विकासात्मक दृष्टिकोन ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे. पाटील यांच्या व्हिजनमुळे ठाणे जिल्ह्यात अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. १२ पदरी ठाणे-भिवंडी बायपास, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, एमएमआरडीएने ग्रामीण भागासाठी दिलेला निधी, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो आदी त्यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष आहे. दरम्यान, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त-भूमिपूत्र आणि लोकनेते दि. बा. पाटील हे न तुटणारे नाते. दिबांची स्मृती कायम राहण्यासाठी २०१६ मध्येच कपिल पाटील यांनी सर्वप्रथम लोकसभेत प्रस्तावित विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली होती.

ओबीसी नेतृत्वाची छाप

ठाणे जिल्ह्यात आगरी व कुणबी समाज मोठ्या संख्येने आहे. किंबहूना आगरी व कुणबी समाजाचे ग्रामीण भागातील राजकारणावर प्रतिबिंब पडते. मात्र, कपिल पाटील यांनी जात हा भेद न ठेवता आगरी व कुणबी समाजाबरोबरच आदिवासींसह इतर समाज एकत्र आणून भिवंडी लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये विजय मिळवून एक अनोखे सोशल इंजिनियरिंग घडविले होते. त्यामुळेच भिवंडीतील विजय हा भाजपाच्या दृष्टीने महत्वाचा ठरला.

 दिवंगत आर. आर. आबांचे भाकित खरे ठरले

कपिल पाटील यांच्या उपस्थितीत २०१४ मध्ये झालेल्या कार्यक्रमाला तत्कालीन मंत्री आर. आर उर्फ आबा पाटील उपस्थित होते. त्यावेळी खासदार कपिल पाटील हे जिल्हा बॅंकेचे चेअरमन होते. मात्र, महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणात कपिल पाटील हे महत्वाची भूमिका बजावतील, असे भाकित आर. आर. आबांनी केले होते. कपिल पाटील यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते खरे ठरले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com