सारे काही उघडा म्हणणारे जबाबदारी घेतील का? उद्धव ठाकरेंची विरोधकांवर टीका - Uddav Thackeray Lashes Out on Opposition over Unlocking | Politics Marathi News - Sarkarnama

सारे काही उघडा म्हणणारे जबाबदारी घेतील का? उद्धव ठाकरेंची विरोधकांवर टीका

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

मागील दिवसांत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपतर्फे मंदिरे खुली करण्यासाठी राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात आली. या आंदोलनांच्या माध्यमातून भाजपने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला चांगलेच घेरले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकाही केली. विविध जिल्हे आणि महत्त्वाच्या शहरात आंदोलन करून सरकारसमोर प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यावर आतापर्यंत ठाकरे यांनी जाहीर भाष्य केले नव्हते

नवी मुंबई  : राज्यभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या परिस्थितीत सर्वकाही उघडा उघडा बोलणारे जबाबदारी घेतील का? रुग्ण वाढले की पुन्हा खापर फोडायला सरकार आहेच, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे मंदिरे खुली करण्यासाठी सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. अनेकदा सरकावर टीकाही केली आहे. त्या आंदोलनाचा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला.

मागील दिवसांत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपतर्फे मंदिरे खुली करण्यासाठी राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात आली. या आंदोलनांच्या माध्यमातून भाजपने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला चांगलेच घेरले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकाही केली. विविध जिल्हे आणि महत्त्वाच्या शहरात आंदोलन करून सरकारसमोर प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यावर आतापर्यंत ठाकरे यांनी जाहीर भाष्य केले नव्हते.

मात्र काल नवी मुंबई महापालिकेच्या ऑनलाईन उद्‌घाटनाच्या कार्यक्रमानिमित्ताने ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, "मागील अनेक दिवसांपासून राज्य सरकार कोरोनाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. काही शहरात सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे; परंतु आता सर्वच काही बंद ठेवून चालणार नाही. त्याकरिता 'मिशन बिगिन अगेन'च्या नावाखाली आपण हळूहळू काही गोष्टी सुरू करीत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा नियंत्रणात आलेले रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. गणेशोत्सवानंतर रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे,''

आपल्याला सर्वकाही सुरू करून जमणार नाही. आपण मिशन बिगेन अगेन म्हणत काही बाबी सुरू करीत आहोत; पण उघडा उघडा बोलणारे पुढची जबाबदारी घेणार आहेत का, असा प्रश्‍न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. जबाबदारीचे काही नाही, रुग्ण वाढले तर सरकार आहेच. खापर फोडायला सरकार आहेच, अशा शब्दांत ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांना सुनावले. या विषयावर अधिक न बोलता ठाकरे यांनी सरकारतर्फे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, त्याची माहिती दिली.
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख