मोदींच्या भेटीनंतर आठवण झाली ती शरद पवारांनी 2019 मध्ये दिलेल्या चकव्याची! - Modi-Pawar meet of July 2017 invokes memory of 2019 | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींच्या भेटीनंतर आठवण झाली ती शरद पवारांनी 2019 मध्ये दिलेल्या चकव्याची!

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 17 जुलै 2021

तेव्हाची भेट यापेक्षा जास्त चर्चेत होती.. 

मुंबई : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका 2019 च्या आॅक्टोबर अखेरीस पार पडल्या होत्या. भाजप 105 जागा जिंकूनही सरकार स्थापन करू शकत नव्हता कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजप नेत्यांचे फोन घेत नव्हते. दुसरीकडे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू होता. काॅंग्रेसच्या नेत्यांकडे सेनेच्या मंडळींच्या चकरा सुरू होत्या आणि त्याच वेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले होते. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या नाट्याचा अंक त्यावेळी जोरात होता.

महाविकास आघाडीचे अद्याप काही ठरले नव्हते. मात्र भाजपची मंडळी अद्याप आपणच सरकार स्थापन करू, अशा विश्वासात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू अखेरच्या क्षणी चालेल आणि काहीतरी चांगले आपल्यासाठी घडेल, अशा भ्रमात ही मंडळी होती. दुसरीकडे शरद पवारही वेगवेगळ्या नेत्यांना भेटत सत्तास्थापनेतील संभ्रम जाणीवपूर्वक वाढवत होते. संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने सकाळी 12 च्या सुमारास शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची वार्ता कानी आली आणि महाराष्ट्रात काहीतरी वेगळे घडणार असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. हातात फाईल घेऊन निघालेल पवार पाहून माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला आणि आपण मोदींना कशासाठी भेटायला निघाला आहात, असा प्रश्न विचारला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी त्या वेळी सांगितले. महाराष्ट्रातील सरकार केव्हा स्थापन होणार, असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार थोडे चिडले. हा प्रश्न मला का विचारता तो शिवसेना आणि  भाजपच्या नेत्यांना विचारा, असे सांगून मोदींना भेटण्यासाठी निघून गेले. 

या दोघांची अर्धा तास तेव्हा भेट झाली. भेटीनंतरही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भेटल्याचा दावा करण्यात आला आणि सत्तास्थापनेचा विषय निघाल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर बऱ्याच घडामोडी होऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. या साऱ्या नाट्यानंतर पवार यांनी मोदींच्या भेटीत काय घडले हे सांगितले. मोदी यांनी तेव्हा भाजपसोबत येण्याची आॅफर दिली होती. मात्र राष्ट्रवादीने ती नाकारली, असे पवार यांनी सांगितले. काहींच्या म्हणण्यानुसार पवार यांनी भाजपने फडवणीसऐवजी दुसरा नेता मुख्यमंत्री म्हणून द्यावा, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली नाही. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी युती तेव्हा होऊ शकली नाही. 

वाचा ही बातमी : काॅंग्रेस व भाजप एकत्र येणार का?

या साऱ्या घडामोडी आठविण्याचे कारण म्हणजे मोदी आणि पवार यांची तब्बल दीड वर्षांनंतर थेट भेट झाली. साहजिकच त्यावरून गदारोळ उठला. सहकारी बॅंकांसदर्भातील कायद्यातील बदल आणि कोरोना स्थितीचा मुकाबला यावर या दोन्ही नेत्यांत भेटी झाल्याचा दावा राष्ट्रवादी काॅंग्रेसने केला असला तरी हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला गेला.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी त्याला वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले. भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस हे एका नदीचे दोन किनारे आहेत. जसे दोन किनारे एकमेकांना कधीच भेटू शकत नाहीत किंवा एकत्र येऊ शकत नाही, तसे आम्ही दोन्ही पक्ष एकत्र काम करणार नाही. भाजपचा राष्ट्रवाद आणि आमचा राष्ट्रवाद यात फरक आहे. त्यामुळे भाजपशी राजकीय सख्य असण्याचे कारण नाही. राजकारणात वैयक्तिक मैत्री असू शकते, भेटी होऊ शकतात याचा अर्थ राजकीयदृष्ट्या ऐकत्र येणार आहे, असा नाही.

वाचा ही बातमी : पवार गेले नरेंद्र मोदींच्या भेटीला...

महाराष्ट्रात 2019 मध्ये सत्ता स्थापनेच्या वेळी पवार आणि मोदी या दोन्ही नेत्यांत भेटी झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मी मोदी यांची भेट घेण्यासाठी जात असल्याचे त्या वेळी पवार यांनी माध्यमांना सांगितले होते. प्रत्यक्षात त्या वेळी दोन्ही नेत्यांत महाराष्ट्रात दोन्ही पक्षांचे एकत्रित सरकार स्थापन करण्याची चर्चा झाली होती. अशी चर्चा झाल्याचे पवारांनीच ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर स्पष्ट केले होते. या घटनेची आठवण मलिक यांना पत्रकारांनी करून दिली असता त्यांनी पवार यांची भेट ही तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीच झाली होती. त्यावेळी मोदींनी भाजपसोबत येण्याची आॅफर दिली होती. मात्र राष्ट्रवादीने ती नाकारली होती, असा दावा मलिक यांनी केला. सध्याचे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचाही दावा त्यांनी केला. . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पवार यांचीही काल दिल्लीत भेट झाल्याची अफवा पसरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख