राज ठाकरेंच्या विरोधात एकमेव आमदार राजू पाटील? विमानतळ नामकरण आंदोलनाला जाणार

राजू पाटील यांनी बुधवारी फेसबुक पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
MNS MLA Raju Patil will participate in New Mumbai Airport Agitation
MNS MLA Raju Patil will participate in New Mumbai Airport Agitation

नवी मुंबई : नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून जोरदार राजकारण तापलं आहे. स्थानिकांकडून दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा आग्रह केला जात आहे. तर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला पसंती दिली आहे. पण त्यानंतर आज विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावासाठी स्थानिकांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील सहभागी होणार आहेत. (MNS MLA Raju Patil will participate in New Mumbai Airport Agitation)

राजू पाटील यांनी बुधवारी फेसबुक पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्थानिकांकडून आज सिडको कार्यालयावर मोर्चा काढून घेराव घातला जाणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागील आठवड्यात राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शिवाजी महाराजांचे नाव पुढे करून या वादात उडी घेतली. त्यावेळी प्रशांत ठाकूर यांनी शिवाजी महाराजांचे नाव दिल्यास मान्य असेल, असे सांगितले होते. पण कृती समितीतील इतरांना ही भूमिका मान्य नाही.

कृती समितीच्या माध्यमातून आज मोर्चा काढण्यात येणार असून त्यामध्ये लाखो नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचे नाव सुचवले असतानाही राजू पाटील हे दि. बा. पाटील यांच्या नावासाठी निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राजू पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला. राहता राहिला प्रश्न २४ जूनच्या आंदोलनाचा. तर मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे. 

राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा जनभावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो. आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. त्यांच्या भावनेचा आणि विचारांचा कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. कारण त्यांच्या  प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत, असं पाटील यांनी म्हटलं आहे. 

राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे. म्हणूनच ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलंय, त्यांचा निषेध करण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत, असे राजू पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com