गावी आला अन्‌ कोरोना पॉझिटिव्ह निघाला 

बारामती तालुक्‍यातील मुर्टी येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.कोरोनाची लागण झालेली व्यक्ती नवी मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करीत होती.
गावी आला अन्‌ कोरोना पॉझिटिव्ह निघाला 
Corona positive patient found in Murti

मोरगाव : बारामती तालुक्‍यातील मुर्टी येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. 

मुर्टीतील कोरोनाची लागण झालेली व्यक्ती नवी मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करीत होती. ती व्यक्ती 12 मे रोजी रितसर पास घेऊन वाशीतून आपल्या मूळ गावी मुर्टी येथील चिरेखाणवाडी येथे कुटुंबासह आली होती. गावात आल्यानंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची व त्याच्या कुटुंबाची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, त्या व्यक्तीला मागील काही दिवसांत त्रास सुरू झाल्याने त्याला बारामती येथे कोरोना तपासणीसाठी दाखल करण्यात आले. रविवारी (ता. 17) रात्री उशीरा तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाला. प्रशासनाने त्वरित मुर्टी महसूली गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. 

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. मुर्टी येथील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व लॉकडाउनदरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर पडू नये. गेली दोन महिने कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बारामतीच्या ग्रामीण भागात पहिलाच रुग्ण सापडला आहे. 

गेली दोन महिने लॉकडाउनमुळे या भागातील सर्व कामे ठप्प झाली होती. गेली काही दिवस शेतकरी यांच्यासह सर्वच व्यवसायिक अडचणीत आले होते. ग्रामपंचायतीने पूर्ण गाव बंद ठेवण्याची भूमिका घेतली होती. गेल्या आठ दिवसांत काही दुकाने सुरू ठेवण्यास ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती. मात्र, कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे आता पूर्ण गाव पुन्हा बंद करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील सहा जणांना तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मुर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अतुल उबाळे यांनी दिली. 

वडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला असून नागरिकांनी बाहेर न पडून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मोरगाव, मुर्टी, तरडोलीसह प्रत्येक गावांत पुणे आणि मुंबई येथे कामासाठी राहत असलेले अनेकजण मूळगावी येत आहेत. याची माहिती प्रशासनास देउन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रातून तपासणी करून घेण्यासाठी त्या गावातील ग्रामपंचायतीने आणि पोलिस पाटील यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in