राजकीय भूकंप घडवलेल्या बलात्कार केसमधील आरोपीला लोणावळ्यात अटक - Odisha Rape Accused Arrested from Lonavala in Joint Operation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

राजकीय भूकंप घडवलेल्या बलात्कार केसमधील आरोपीला लोणावळ्यात अटक

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

देशभरात १९९९ मध्ये गाजलेल्या अंजना मिश्रा बलात्कार प्रकरणातल्या मुख्य आरोपीला एका संयुक्त कारवाईत अटक करण्यात यश आले आहे. नवी मुंबई व पुणे ग्रामीण पोलिसांनी यात महत्त्वाची भूमिका निभावली. पुणे ग्रामीण पोलिस, ओरिसा पोलिस यांनी नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने बिबन बिस्वाल या आरोपीला 'आॅपरेशन सायलेंट व्हायपर' राबवून अटक करण्यात केली.

नवी मुंबई : देशभरात १९९९ मध्ये गाजलेल्या अंजना मिश्रा बलात्कार प्रकरणातल्या मुख्य आरोपीला एका संयुक्त कारवाईत लोणावळ्यातून अटक करण्यात यश आले आहे. नवी मुंबई व पुणे ग्रामीण पोलिसांनी यात महत्त्वाची भूमिका निभावली. पुणे ग्रामीण पोलिस, ओरिसा पोलिस यांनी नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने बिबन बिस्वाल या आरोपीला 'आॅपरेशन सायलेंट व्हायपर' राबवून अटक करण्यात केली. भुवनेश्वरचे पोलिस आयुक्त सुधांशू सरंगी यांनी हे आॅपरेशन सुरु केले होते. या आॅपरेशनमध्ये तब्बत बावीस वर्षांनी आरोपीला अटक करण्यात आली होती. 

अंजना मिश्रा या भारतीय वनसेवेतील अधिकारी सुभाष चंद्र मिश्रा यांच्या पत्नी. त्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. ९ जानेवारी, १९९९ रोजी त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यावेळी या प्रकरणात ओरिसाचे तत्कालिन मुख्यमंत्री जे. बी. पटनाईक व त्यांचे मित्र आणि ओरिसाचे माजी अॅडव्होकेट जनरल इंद्रजित राय यांची प्रमुख भूमीका असल्याचा आरोप अंजना मिश्रा यांनी केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली. त्यामुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन झाली. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पटनाईक यांना बदलून गिरिधर गमांग यांची ओरिसाच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. 

९ जानेवारी, १९९९ रोजी अंजना मिश्रा आपल्या पत्रकार मैत्रिणीबरोबर मोटारीतून जात असताना भुवनेश्वर शहराच्या बाहेर एका निर्जन स्थळी तीन जणांनी त्यांची मोटार अडवली. नंतर या तीन जणांनी मिश्रा यांच्यावर मैत्रीणीसमोरच सामुहिक बलात्कार केला होता. २६ जानेवारी, १९९९ रोजी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तिसरा आरोपी बिबन बिस्वाल हा फरारी झाला होता. त्याला २२ फेब्रुवारी, २०२१ रोजी पुण्यातून अटक करण्यात आली. १९९९ मध्ये ओरिसा उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. ५ मे १९९९ रोजी सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. 

२० एप्रील २००२ रोजी ओरिसा न्यायालयाने दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रदीप साहू आणि धिरेंद्र मोहंती अशी या आरोपींची नांवे आहेत. या प्रकरणातला कट उलगडण्यासाठी बिस्वाल अटक होणे आवश्यक होते. अखेर महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने ओरिसा पोलिस त्याला अटक करु शकले.

यापूर्वीही आपल्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा आरोप अंजना मिश्रा यांनी केला होता. तत्कालिन अॅडव्होकेट जनरल इंद्रजीत राय यांनी आपल्यावर ११ जुलै १९९७ रोजी कामाच्या बहाण्याने बोलावून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार अंजना मिश्रा यांनी नोंदवली होती. त्यावळी राय यांच्यावर काहीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यावेळी महिला संघटनांनी मोठी आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांनाही या संघटना भेटल्या. मुख्यमंत्री राय यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप अंजना मिश्रा यांनी केला होता. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेले. त्यानंतर राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बलात्काराच्या प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली राय यांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. 

या कारवाईत नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचचे उपायुक्त प्रवीण पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक निवृत्ती कोल्हटकर, एपीआय संतोष पवार आणि पोलिस नाईक मिथून भोसले, पुणे जिल्हा ग्रामीणचे अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, सहाय्यक पोलिस अधिक्षक नवनीत कुमार, लोणावळा पोलिस ठाण्याचे निरिक्षक दिलीप पवार आणि पोलिस हेड काँन्स्टेबल निलेश केवाडे आणि भारत मोरे यांनी सहभाग घेतला.

बिबन बिस्वाल हा नांव बदलून लोणावळ्याती अँबी व्हॅली येथे रहात होता. तो प्लंबरचे काम करत होता. त्याने आपले आधारकार्डही बनवून घेतले होते. त्याने जालंधरा स्वैन असे नांव धारण केले होते. तो आपल्या कुटुंबाच्या संपर्कात होता. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या कुटुंबाला आपले डेथ सर्टिफिकेट तयार करण्यास सांगितले होते. पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यानंतर ओरिसा पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर आॅपरेशन सायलेंट व्हायपर राबवून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख