राज ठाकरे नियम धुडकावून विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार?  - Will Raj Thackeray break the rules and attend the wedding ceremony at Vikramgad? | Politics Marathi News - Sarkarnama

राज ठाकरे नियम धुडकावून विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार? 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

या सोहळ्यात 1100 जोडप्यांची नोंद करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून केला जाणार आहे.

विक्रमगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या 26 फेब्रुवारी रोजी विक्रमगड येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या सोहळ्याची जय्यत तयारी मनसेकडून करण्यात येत आहे. कारण, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे हे स्वतः या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गोष्टींवर निर्बंध आणले आहेत. त्यात विवाह सोहळ्यासाठी 200 जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे राज ठाकरे हे आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याला नियम मोडून उपस्थित राहणार का? असा प्रश्‍न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विक्रमगड येथे होणाऱ्या या सामूहीक विवाह सोहळ्यासाठी आतापर्यंत 700 जोडप्यांची नोंदणी झालेली आहे. या सोहळ्यात 1100 जोडप्यांची नोंद करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून केला जाणार आहे. येत्या 26 फेब्रुवारीला होणारा हा विवाह सोहळा नियमांचे काटेकोरपणे पालन करून होणार आहे. एका वेळी 50 जोडप्यांनाच लग्नमंडपात प्रवेश दिला जाणार आहे. टप्याटप्याने सर्व जोडप्यांना मंडपात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती पालघर व ठाणे जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. जाधव हे स्वतः विवाह सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत. 

दरम्यान या सोहळ्यासाठी राज ठाकरे व शर्मिला ठाकरे हे उपस्थितीत राहणार आहेत. पण, शासकीय नियम पाहता एवढा मोठ्या संख्येने जमाव जमविणे हे कायद्याचे उल्लंघन होऊ शकते, त्यामुळे राज ठाकरे हे नियम मोडून या सोहळ्याला उपस्थित राहणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

नियम मोडणाऱ्या लग्न समारंभांवर कारवाई 

पालघर : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. परंतु, यानंतर काही ठिकाणी हे नियम धुडकावले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवारी तीन लग्नांच्या हळदी समारंभात गर्दी झाल्याने कारवाई करण्यात आली असून पालघर व सातपाटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. 

रविवार, सोमवार हे दोन दिवस लग्नाचे मुहूर्त होते. पालघर सातपाटी रस्त्यावरील जलदेवी रिसॉर्टवर हळदीच्या कार्यक्रमानिमित्त दोनशे लोक जमा झाले होते. यावेळी डीजेवर नाच सुरू असताना कोणत्याही प्रकारे सामाजिक अंतर पाळले जात नव्हते, मास्कचा वापर केला जात नव्हता. त्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर व पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्ट मालकासह नवरदेवाचे वडील, डीजे आणि केटरर्स यांच्याविरोधात सातपाटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

दुसरा छापा सातपाटी गावातील मच्छीमार सहकारी संस्थेच्या जवळ लग्न समारंभाचा हळदीचा कार्यक्रम होता. तेथेही मोठा लोकसमुदाय जमा झाला होता. त्या ठिकाणीही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितावर सातपाटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पालघर बोईसर रस्त्यावरील बिरवाडी या गावात हळदीचा कार्यक्रम सुरू असताना छापा टाकला. तेथेही मोठा लोकसमुदाय होता. तेथीलही संबंधितावर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख