वसई-विरार, भिवंडी महापालिकेची हद्द वाढणार; या गावांचा होणार समावेश  - Vasai-Virar, Bhiwandi Municipal Corporation boundary will be increased-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

वसई-विरार, भिवंडी महापालिकेची हद्द वाढणार; या गावांचा होणार समावेश 

संदीप पंडित  
सोमवार, 26 जुलै 2021

अर्नाळा नगरपंचायतीचा प्रस्ताव असतानाच वसई-विरार शहर महापालिकेच्या विस्ताराचे वेध लागले आहेत.

विरार : वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा तिढा मुंबई उच्च न्यायालयात असतानाच या महापालिकेचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. वसई तालुक्यातील अर्नाळा ग्रामपंचायत लोकसंख्येनुसार अर्नाळा नगरपंचायतीचा प्रस्ताव असतानाच वसई-विरार शहर महापालिकेच्या विस्ताराचे वेध लागले आहेत. अर्नाळा व अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीसह आणखी २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची गोपनीय माहिती हाती आली आहे. तसेच, भिवंडी महापालिकेचाही विस्तार होत असून २८ नवीन गावे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे समजते. (Vasai-Virar, Bhiwandi Municipal Corporation boundary will be increased; These villages will be included)

वसई-विरार महापालिका स्थापनेपासूनच गावे वगळण्याचा मुद्द्यावरून वादात सापडली आहे. गावे वगळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुरू आहे. बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गावे वगळण्याबाबत अनेकदा भूमिका बदलली आहे. याशिवाय लोकसंख्येनुसार अर्नाळा ग्रामपंचायतीचा अर्नाळा नगरपंचायत निर्मितीचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. असे असताना वसई-विरार पालिकेच्या विस्ताराची चक्रे मंत्रालयातून फिरवली जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

हेही वाचा : पेणचा पुढचा आमदार शिवसेनेचा असेल

वसई विरारमध्ये ही गावे येणार

पालिकेच्या विस्तारामध्ये विरार पश्चिमेतील अर्नाळा ग्रामपंचायत, अर्नाळा किल्ला, मुक्काम, कोल्हापूर, टेंभी, पाटीलपाडा, पूर्वेतील भाटपाडा, डोलीवपाडा, खैरपाडा, खार्डी तर वसई पश्चिमेतील खोचिवडे, पाली, तर्खड, आकटन, वासलई, रानगाव, तसेच नालासोपारा पश्चिमेतील सत्पाळे, कलंब, नायगाव पूर्वेतील चंद्रपाडा, मालजीपाडा, मोरी, सारजा मोरी, टिवरी, टोकरे या गावांचा समावेश होणार असल्याचे समजते. 

यापूर्वी वसई तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती राहिल्या आहेत त्या ठिकाणी नगरपरिषद आणि नगरपंचायती करण्याचे जवळपास नक्की झाले होते; परंतु न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने हा निर्णय कागदावर राहिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वसईतील काही नेत्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला होता; परंतु तो नंतर मागे पडला असतानाच आता नव्याने गावे समाविष्ट करण्याचा निर्णय मंत्रालय पातळीवर घेण्याचे घट्ट असल्याचे मंत्रालय सूत्रांकडून समजते.

दरम्यान, वसई-विरार पालिकेतील गावे वगळण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना तसेच या प्रश्नावर तीव्र आंदोलने झाली असताना पुन्हा एकदा गावांच्या प्रश्नावर रान पेटणार असल्याचे चित्र आहे. अगोदरच पालिकेच्या वाढीव उपभोक्ता करावरून वसई-विरारमध्ये नागरिकांत प्रचंड नाराजी असताना पालिकेत नवीन गावे समाविष्ट करण्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मंत्रालयातून अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही.

जिल्हा परिषद, पालिकेचा ठराव महत्त्वाचा

महापालिकेत गावे समाविष्ट करताना जिल्हा परिषद आणि महापालिकेचा ठराव लागणार आहे. सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने हा ठराव कसा होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. जिल्हा परिषदेचाही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यास विरोध नसल्याचा ठराव लागणार आहे. त्यावर हरकती आणि सूचना मागविल्यानंतरच गावे महापालिकेत समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे.

भिवंडी पालिकेत ही गावे समाविष्ठ होणार

भिवंडी-निजामपूर महापालिकेत काल्हेर, खोणी, पुरणे, कोण, करवली, राहणाल, शेलार, दिवे अंजूर, घोळगाव गोवे, गुंडावली, कशेळी, कोपर, माणकोली, ओवाळी, पिंपळास, पिंपळगाव, पिपंळनेर राजणोली, सरवली, सवांडे, सोनाळे, कैलास नगर, ठाकूरगाव पिंपळघर, वळ, राजनगर आदी गावे समाविष्ट करण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख