Thane Municipal Corporation will soon give good news to the employees
Thane Municipal Corporation will soon give good news to the employees

ठाणे महापालिका लवकरच देणार कर्मचाऱ्यांना गोड बातमी 

त्याची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाणे : कोरोना संकटामुळे ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर परिणाम झाला असला, तरी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढीची खुशखबर आहे. राज्य सरकारने दीड वर्षांपूर्वीच ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यास हिरवा कंदील दाखवला असून प्रशासनाने आता त्याची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

ठाणे पालिकेतील कर्मचाऱ्यांना या वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. ता. 19 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत तो मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन 12 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे. ही वेतन श्रेणी आस्थापनेवरील कर्मचारी आणि शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे. परिवहन सेवा पालिकेच्या अखत्यारीत असली, तरी ती स्वतंत्र आस्थापना असल्याने त्यांना या वेतनश्रेणीचा लाभ होणार नसल्याने हिरमोड झाला आहे. 

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकार आणि अन्य पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीबाबतचा निर्णय घेण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी के. पी. बक्षी यांची समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या शिफासशीनुसार मुंबई वगळून अन्य पालिकेतील कर्मचाऱ्यांना ही वेतनश्रेणी लागू करण्यास शासकीय निर्णय 2 ऑगस्ट, 2019 मध्ये जाहीर झाला आहे. 

त्याशिवाय पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाटील लवादानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली होती. ती मुदतही 31 जानेवारी, 2015 रोजी संपली आहे. त्यामुळे 1 जानेवारी, 2016 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी कामगार संघटनांनी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर 10 हजार 500 पदे मंजूर झाली असून 6,500 कर्मचारी काम करत आहे; तर शिक्षण मंडळात दीड हजार कर्मचारी आहेत. त्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे. टीएमटी ही महापालिकेशी संलग्न असली, तरी त्यांची आस्थापना स्वतंत्र आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनवाढीचा अंतर्भाव या प्रस्तावात नाही. 

वार्षिक 115 कोटींचा अतिरिक्‍त बोजा पडणार 

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यास तिजोरीवर वार्षिक 114 कोटी 79 लाखांचा अतिरिक्त भार पडणार आहे. याशिवाय वेतनश्रेणी लागू करताना 2016 ते 2021 पर्यंतच्या फरकाची रक्कम द्यायची ठरल्यास, तिजोरीवर किमान 500 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com