शिवसेनेचा राणेंना माथेरानमध्ये; तर भाजप, मनसेला पनवेलमध्ये धक्का

पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राणे यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.
शिवसेनेचा राणेंना माथेरानमध्ये; तर भाजप, मनसेला पनवेलमध्ये धक्का
Swabhiman, BJP, MNS workers from Matheran, Panvel join Shiv Sena

नेरळ (जि. रायगड) : माथेरानमध्ये शिवसेनेने राणे यांना जोरदार धक्का दिला आहे. आमदार नीतेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या माथेरानच्या अध्यक्षांसह सुमारे ४० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.  पनवेल आणि नवीन पनवेलमधील भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले. (Swabhiman, BJP, MNS workers from Matheran, Panvel join Shiv Sena)

राज्यात शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शिवसेनेने आमदार नीतेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेस खिंडार पाडले आहे. संघटनेचे माथेरानचे अध्यक्ष सागर पाटील यांनी आपल्या 40 सहकाऱ्यांसह शिवबंधन हाती बांधले आहे. पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राणे यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.  

माथेरानमध्ये शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी आणि संपर्कप्रमुख प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली माथेरान स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष तथा महापालिकेच्या समर्थ कामगार सेनेचे अध्यक्ष सागर पाटील यांनी शिवधनुष्य हाती घेतले आहे. माथेरान शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात सागर पाटील यांच्यासह स्वाभिमान संघटनेच्या 40 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाणे पसंत केले आहे. 

सागर पाटील यांच्या शिवसेना पक्षप्रवेशासाठी स्वीकृत नगरसेविका ऋजुता प्रधान, तसेच गटनेते नगरसेवक प्रसाद सावंत, शिवसैनिक विकास पार्टे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. या पक्ष प्रवेशाच्या वेळी शिवसेनेचे नगरसेवक शकील पटेल हे देखील उपस्थित होते.


पनवेलमधील भाजप, मनसे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

खारघर : पनवेल आणि नवीन पनवेलमधील भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यतीन देशमुख, अविनाश गव्हाणकर, सिद्धेश गुरव, सतीश गायकर, सुनील जाधव, अक्षय घाडी, विकास वारदे, चंद्रप्रताप प्रजापती, जितेश खिळदकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. 

पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम खारघरमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडला. या वेळी रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, नवीन पनवेल शहर प्रमुख रूपेश ठोंबरे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी मंत्री देसाई म्हणाले, राज्यात शिवसेना पक्षाची वाढ होत आहे. जास्तीत जास्त तरुण कार्यकर्ते पक्षात प्रवेश करीत असून प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार काम करा, असे सांगून देसाई यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in