धक्कादायक  ः ठाण्यात एकाच महिलेला कोरोना लसीचे तीन डोस?   - Shocking : Three doses of corona vaccine given to the same woman in Thane? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

धक्कादायक  ः ठाण्यात एकाच महिलेला कोरोना लसीचे तीन डोस?  

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 28 जून 2021

महापालिकेचे डॉक्टर तिच्‍यासह कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत.

ठाणे : ब्रह्मांड येथील रूपाली साळी यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे तीन डोस दिल्‍याची धक्‍कादायक बाब उघडकीस आली आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने त्या महिलेच्‍या उपचारांची जबाबदारी घ्यावी, असे पत्र भारतीय जनता पक्षाने महापालिका आयुक्तांना दिले आहे. (Shocking : Three doses of corona vaccine given to the same woman in Thane?)

महापालिका प्रशासनाने त्या महिलेला तीन वेळा डोस दिलेला नसून तीन वेळा सुई टोचल्याने रिॲक्शन झाल्‍याचे स्‍पष्‍टीकरण दिले आहे. त्‍या महिलेची प्रकृती व्यवस्थित असून महापालिकेचे डॉक्टर तिच्‍यासह कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : बागल-जगताप संघर्ष टोकाला; सचिवाबाबतच्या बैठकीला काही संचालक दांडी मारणार?

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड येथील लसीकरण केंद्रावर रूपाली साळी यांना तीन वेळा कोरोना लस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्‍याकडे पत्रव्यवहार केला आहे. साळी यांची आरोग्य तपासणी करून उपचाराचा खर्च करावा, त्याचबरोबर भविष्यातील आजारावर उपचार करण्याबाबत जबाबदारी स्वीकारावी. तसेच, संबंधित प्रकरणात दोषी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही डुंबरे यांनी पत्रातून शर्मा यांच्याकडे केली आहे. 

एवढी मोठी चूक होतेच कशी?

ठाणे महानगरपालिकेच्या चुकीमुळे रूपाली साळी यांना तीन वेळा डोस देण्यात आला आहे. या महिलेला काही झाल्‍यास याची जबादारी कोण घेणार? दोन लसींमधील अंतर ठरवून दिले असताना अशी मोठी चूक महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर होतेच कशी? या सर्व गोष्टींचा खुलासा पालिकेकडून झाला पाहिजे. तसेच, दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. 

रूपाली साळी यांना तीन वेळा डोस दिलेला नाही. तीन वेळा सुई टोचल्याने त्यांना रिॲक्शन आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी महापालिकेचे डॉक्टर संपर्कात आहेत. आता साळी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीकडे डॉक्टर लक्ष ठेवून असल्याने चिंतेचे कोणतेही कारण नाही.

-संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महानगरपालिका

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख