कर्नाळा बँकेच्या गैरव्यवहारात बुडाले सुखी संसाराचे स्वप्न! - Santosh Phadke had to stop his marriage due to  Karnala Bank fraud | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

कर्नाळा बँकेच्या गैरव्यवहारात बुडाले सुखी संसाराचे स्वप्न!

सुजित गायकवाड 
गुरुवार, 17 जून 2021

जमीन विकल्यानंतर आलेले पैसे महेंद्र याने स्वतःच्या आणि भावाच्या लग्नासाठी कर्नाळा बँकेत ठेवले होते.

नवी मुंबई : पनवेलमधील कर्नाळा बँकेतील आर्थिक गैरव्यवहारामुळे  बंद झाल्यामुळे देवद गावातील युवकाच्या सुखी संसाराच्या स्वप्नांची राख-रांगोळी झाली आहे. घरातील नातेवाईकांकडून कर्ज घेऊन अखेर एका भावाचे लग्न साध्या पद्धतीने आटोपते घ्यावे लगले. मात्र, पैसे नसल्याने लहान भावाला लग्नासाठी थांबवावे लागले आहे. (Santosh Phadke had to stop his marriage due to  Karnala Bank fraud)

पनवेल तालुक्यातील सुकापूर-देवद गावात लहानाचा मोठा झालेल्या महेंद्र फडके याला कर्नाळा बँकेतील गैरव्यवहाराचा मोठा फटका बसला आहे. गावची जमीन विकल्यानंतर आलेले तीन लाख ५० हजार रुपये महेंद्र याने स्वतःच्या आणि भावाच्या लग्नासाठी २०१८-१९ या वर्षी कर्नाळा बँकेत ठेवले होते. सुरुवातीपासून वडिलांचे बँक खाते कर्नाळा बँकेत असल्यामुळे आणि विवेक पाटील यांच्यावरील विश्वासाने आपल्या भविष्याचा आधार ठेवण्यासाठी त्यांनी ही बँक निवडली होती. मात्र, दोन वर्षांत बँकेची अर्थव्यवस्था घसरल्याने बँक डबघाईला येऊन बंद करण्याच्या मार्गावर येऊन ठेपली. अशा परिस्थितीत महेंद्र स्वतःला स्थळ पाहण्यात व्यस्त होता. स्थळ पसंत झाल्यावर एकीकडे महेंद्रचे लग्न ठरले, तर दुसरीकडे बँकेला उतरती कळा लागली.

हेही वाचा : मी अपक्ष आमदार; लवकरच शरद पवारांना भेटणार
 
लग्न करण्यासाठी पैसे नसल्याने महेंद्र आणि त्याच्या आईने बँकेत हेलपाटे मारण्यास सुरुवात केली. पण पदरी निराशा पडत गेली. अखेर विवेक पाटील यांच्या नवीन पनवेल येथील राहत्या घरी महेंद्र यांनी त्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. अडकलेले पैसे देण्याची पाटील यांना विनंती केली. सोबत लग्नाची पत्रिकाही दिली. पाटील यांनी महेंद्रची समजूत काढून मदत करण्याची खात्री देऊन बँकेत बोलावून घेतले. 

दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्यावर महेंद्रला बँकेतील पैसे देण्याऐवजी पतपेढीतून कर्ज काढण्याचा सल्ला दिला, त्याचे हप्ते भरा असे सांगितल्यानंतर महेंद्र समोर वेगळाच प्रश्न उभा राहिला. अखेर महेंद्र याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. एकीकडे लग्न, तर दुसरीकडे फसवणूक अशी परिस्थिती असताना महेंद्रची आई आणि भावाने नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन थाटामाटाऐवजी साध्या पद्धतीने महेंद्रचे लग्न लावून दिले. पण, महेंद्रसोबत आपल्या लग्नाचे गुलाबी स्वप्न पाहणारा महेंद्रचा भाऊ संतोषला मात्र अजूनपर्यंत बिना लग्नाचे राहावे लागले. 

नातेवाईकांकडून गोळा झालेल्या पैशांत दोघांचे लग्न होणे शक्य नसल्याने संतोषला समजूतदारपणा दाखवून थांबायला लागले. महेंद्रलाही आपल्या भावाचे लग्न ठेवून आपल्याला साध्या पद्धतीने लग्न करून घ्यावे लागल्याचे शल्य आयुष्यभर मनात राहणार आहे. पैसे असूनही लग्नाची स्वप्ने पूर्ण करता न आल्याने ही बाब संतोषच्या जिव्हारी लागली आहे. संतोष रिक्षा चालवतो. रिक्षा चालवून हळूहळू जमापुंजी झाल्यावर तो लग्न करणार आहे. 

आतातरी आमचे पैसे मिळतील का?

कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना अटक झाल्याची बातमी समजली. आधी बँक मालमत्ता विकून आमचे पैसे देईल हे ऐकले होते. आता पाटील यांना अटक झाल्यानंतर तरी पैसे मिळतील का, असा प्रश्न मनात आहे, असे ठेवीदार महेंद्र फडके यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख