शिवसेनेने शब्द पाळला; सभापतिपदी राष्ट्रवादीला दिली संधी - Raghunath Mali elected as Sabhapati of Wada Panchayat Samiti-vd83 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

शिवसेनेने शब्द पाळला; सभापतिपदी राष्ट्रवादीला दिली संधी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जुलै 2021

या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.

वाडा (जि. पालघर) : महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या समझोत्याप्रमाणे शिवसेनेने शब्द पाळत राष्ट्रवादीला सभापतीपदाची संधी दिली. त्यानुसार वाडा पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी सोमवारी (ता. २० जुलै) झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रघुनाथ माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. (Raghunath Mali elected as Sabhapati of Wada Panchayat Samiti)

वाडा पंचायत समितीची एकूण सदस्य संख्या १२ आहे. यामध्ये शिवसेनेचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, भारतीय जनता पक्षाचे २ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक असे संख्याबळ आहे. अलीकडेच उच्च न्यायालयाने दिलेल्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून निवडून आलेल्या कृत्तिका ठाकरे यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. 

हेही वाचा : भाजप धक्का देण्याचा धसका : तीन मंत्री, दोन खासदार, पाच आमदार होते टेन्शनमध्ये

वाडा पंचायत समितीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी आहे. या आघाडीच्या माध्यमातून समझोता झाल्याप्रमाणे पहिले सव्वा वर्षासाठी सभापतिपद शिवसेनेकडे होते. शिवसेनेच्या वतीने योगेश गवा ह्यांना सभापतीपदाची संधी देण्यात आली होती. योगेश गवा यांचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

गवा यांच्या राजीनाम्यानंतर हे पद शिवसेना आणि राष्ट्रावादील समझोत्याप्रमाणे राष्ट्रवादीकडे येणार होते. त्यानुसार शिवसेनेने शब्द पाळून राष्ट्रवादी संधी देण्यात आली. त्यानुसार पुढील सव्वा वर्षासाठी राष्ट्रवादीचे रघुनाथ माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माळी हे पंचायत समितीच्या डाहे गणातून निवडून आले आहेत. 

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अर्चना कदम यांनी काम पाहिले. आमदार दौलत दरोडा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माळी यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत करून अभिनंदन केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख