अंबरनाथ : महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीच्या वातावरणामुळे सध्या पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. तरीही भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर माझा विश्वास नाही. पक्षात प्रवेश दिला तरी त्यांना दोन वर्षे सत्तेच्या बाहेरच ठेवा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आयोजित कार्यकर्ता आढावा बैठकीत आव्हाड बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे खानावळ नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष वाढीसाठी किती त्याग केला, याची जाणीव व्हावी, यासाठी पक्ष प्रवेश करणाऱ्यांना दोन वर्षे सत्तेच्या पदाच्या बाहेरच ठेवण्याचे आवाहन गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी केले.
नगरपालिका निवडणूक लढायची तयारी ठेवा, महाविकास आघाडीच्या निर्णयावर पुढील निर्णय अवलंबून असेल असे सांगून आव्हाड यांनीही मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.
विधानसभा निवडणुकीत भाजपला कात्रजचा घाट दाखवण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत असून आता नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी सत्तेत येईल, असा विश्वास प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांनी व्यक्त केला.
या वेळी प्रमोद हिंदुराव, महेश तपासे, दशरथ तिवरे, विद्या वेखंडे, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार, वृषाली पाटील, कबीर गायकवाड आदींची भाषणे झाली. शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी प्रास्ताविक केले.
भाजपच्या विभागीय उपाध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश
भाजपचे ठाणे जिल्हा विभागीय उपाध्यक्ष किसनराव तारमळे यांच्यासह कॉंग्रेसचे माजी नगरसेवक बिरजू जयस्वाल, भगवान सासे आदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले.

