आधी कामाची माहिती घेतली; मगच कपिल पाटलांनी पदभार स्वीकारला - Kapil Patil assumes charge of Panchayat Raj Ministry | Politics Marathi News - Sarkarnama

आधी कामाची माहिती घेतली; मगच कपिल पाटलांनी पदभार स्वीकारला

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

ठाणे जिल्ह्याला  ७४ वर्षांत प्रथम मंत्रीपद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला आहे.

भिवंडी : कपिल मोरेश्वर पाटील यांनी आज (ता. १२ जुलै) केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी देशभरातील तळागाळातील व दुर्गम भागातील ग्रामस्थांपर्यंत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना पोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. (Kapil Patil assumes charge of Panchayat Raj Ministry)

केंद्रीय राज्यमंत्रिपदाची खासदार कपिल पाटील यांनी ७ जुलै रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन प्रशासनातील कामकाजाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पंचायत राज मंत्रालयात खासदार पाटील यांनी आज राज्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. या वेळी मुरबाडचे आमदार किसन कथोरे, भाजपाचे प्रदेश सचिव विनोद तावडे उपस्थित होते.

हेही वाचा : अमित शहा सहकार मंत्री बनले अन्‌ भाजप नेत्यांकडून धमक्या देणे सुरू

पंचायत राज खात्याच्या माध्यमातून देशातील दोन लाख 79 हजार ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी जाहीर केलेल्या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घराला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल. या योजनेतून गावाचा विकास आराखडा करून त्याची टप्प्याटप्प्यात अंमलबजावणी केली जाईल, असे कपिल पाटील यांनी सांगितले. 

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तीन स्तरावर विभाजन करून ग्रामीण भागात आदर्श ग्राम योजना राबविली जाईल. त्यातून गावाच्या विकासाचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ग्राम विकास हा पायलट प्रोजेक्ट काही राज्यात राबविण्यात येईल. ई- ग्रामपंचायत योजनेची अंमलबजावणी करून गावांना आधुनिक विकासाची जोड, स्वयंपूर्ण गावासाठी आधुनिक ग्रामविकासाचा रोड मॅप केला जाणार आहे, असे पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांनी सूत्रे स्विकारल्यानंतर नमूद केले.

ठाणे जिल्ह्याला  ७४ वर्षांत प्रथम मंत्रीपद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला आहे. पंतप्रधानांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून उल्लेखनीय काम करणार आहे, असे राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.

 पाटलांच्या अभिनंदनासाठी दिल्लीत कार्यकर्त्यांची रिघ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर नवनियुक्त मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीतच उपस्थित राहून कामकाजाची माहिती घ्यायची आहे. त्यामुळे राज्यमंत्री कपिल पाटील यांना मतदारसंघात येता येणार नाही. त्यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील आमदार, नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी नवी दिल्लीत जाऊन राज्यमंत्री कपिल पाटील यांचे अभिनंदन केले. तसेच, भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शेकडो नागरीकांनी दूरध्वनी, सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिष्टचिंतन केले. या अभिनंदनाचा स्वीकार करीत राज्यमंत्री पाटील यांनी ठाणे व पालघर जिल्ह्यातील नागरीकांच्या प्रेमाने भारावून गेलो असल्याचे नमूद केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख