एकनाथजी, प्रतापला कुठेही कट मारू नका : उद्धव ठाकरे

म्हणून मी तुमचे अभिनंदन करत आहे.
एकनाथजी, प्रतापला कुठेही कट मारू नका : उद्धव ठाकरे
Dedication of Oxygen Plant at Mira Bhayandar by the Chief Minister

मीरा-भाईंदर  ः ‘प्रताप, तुमच्या मागण्यांच्या वेळी बोलत असताना मध्ये मध्ये आवाज कट होत होता,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर आमदार सरनाईक मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, ‘तुम्ही अंतर्यामी आहात.’ त्याला उत्तर देताना, ‘एकनाथजी, प्रताप चांगले काम करत आहेत, त्यांना कुठेही कट मारू नका. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी आपण कायम राहिलेलो आहोत आणि चांगले काम होत राहील,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी उभे राहण्याचे संकेत दिले. (Dedication of Oxygen Plant at Mira Bhayandar by the Chief Minister)

विहंग चरिटेबल ट्रस्ट आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यातून मीरा-भाईंदर येथे ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आला आहे. त्याचे उद्‌घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. त्यावेळी ठाकरे बोलत होते. या वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक व इतर मान्यवर मीरा भाईंदर येथे व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात ऐकणे आणि बोलणेसुद्धा आता नको वाटते. ते ऐकून आजही अंगावर काटा येतो. रात्री रात्री जागून प्रशासकीय अधिकारी आणि शिवसैनिकसुद्धा त्यावेळी काम करत होते, त्याला तोड नाही. प्रशासकीय अधिकारी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांमुळे मी देशातील एक नंबरचा मुख्यमंत्री ठरलो असेल, तर त्यात नवल ते काय. या श्रेयाचे मानकरी हे सर्व सहकारी आहेत.

दुसरी लाट ओसरली आहे, आता ऑक्सिजन प्लँटची काय गरज आहे. आता जेव्हा पुन्हा केव्हा लाट येईल, तेव्हा सरकारच्या डोक्यावर बसू. हे जे काही जणांचे राजकारण चाललेले आहे. पण लाट ओसरण्यासाठी किती कष्ट करावे लागले. त्याची कोणाला जाण आणि भानही नाही. हे करा, ते करा, नाही तर आम्ही आंदोलनं करू. पण आंदोलन कसली करताय. कोरोना हा काय सरकारमान्य कार्यक्रम नाही. पण आंदोलन करायची असतील तर अशी आंदोलन करा की आम्ही जास्तीत जास्त ऑक्सिजन प्लँट लावू. आंदोलन करायची असतील आणि स्पर्धा करायची असेल तर ती आरोग्यदायी असावी, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी बोलताना केली. 

जशा केंद्र सरकारच्या मर्यादा आहेत, तशा राज्याच्यासुद्धा आहेत. शांततेच्या काळात गेल्या वेळी जो काही अनुभव आला. तो येऊ नये, यासाठी तयारी करण्याची गरज असते. ते आमदार प्रताप सरनाईक हे सध्या करत आहेत. म्हणून मी तुमचे अभिनंदन करत आहे. या सर्व प्रतिकूल काळातसुद्धा तुम्ही चांगली कामे केली आहेत. ती सर्व जनतेच्या उपयोगाची आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या कामाचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.