जितेंद्र आव्हाडांच्या हस्तक्षेपाने ११ युवतींची हॉटेलमधून सुटका - Youth employee rescued after jitendra Awhad Phone. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

जितेंद्र आव्हाडांच्या हस्तक्षेपाने ११ युवतींची हॉटेलमधून सुटका

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी युवतीची तक्रार गांभीर्याने घेत शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांच्यामार्फत पाथर्डी फाटा भागातील एका नामांकित हॉटेलमधून ११ युवक- युवतींची मंगळवारी सुटका करण्यात यश आले.

नाशिक : गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी युवतीची तक्रार गांभीर्याने घेत शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांच्यामार्फत पाथर्डी फाटा भागातील एका नामांकित हॉटेलमधून ११ युवक- युवतींची मंगळवारी सुटका करण्यात यश आले. या सर्वांना हॉटेल प्रशासनाकडून दमबाजी करत, तुम्ही येथून काम सोडून जाऊ शकत नसल्याचे सांगत त्यांना एका खोलीत बंदिस्त करून ठेवल्याची धक्कादायक चर्चा परिसरात सुरू आहे.

श्री. दराडे यांनी मंत्री आव्हाड यांना प्रतिसाद देत रवींद्र गामने, रवींद्र चव्हाण आणि पोलिसांच्या मदतीने त्या सर्वांना आपल्या गावी पाठविले. मात्र, या मुलांनी मारहाण झाल्याचा आणि डांबून ठेवल्याच्या प्रकार झाल्याचा इन्कार पोलिसांपुढे करत, ‘आम्हाला आमच्या गावी जायचे आहे’, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी कोणताही गुन्हा संबंधित हॉटेलवर दाखल केला नाही.
याबाबत दराडे यांनी सांगितले, की डांबून ठेवलेल्या मुलींपैकी एकीने तिच्या मुंबईच्या मैत्रिणीला झालेला प्रकार सांगून सुटका करण्यासाठी मदत मागितली. नंतर तिच्या मैत्रिणीने हा प्रकार थेट गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांना सांगितला. श्री. आव्हाड यांनी श्री. दराडे यांना फोनवर मुलींची सुटका कशी करता येईल, याबाबत नियोजन करण्यास सांगितले.

दरम्यान, यापैकी एका युवतीने दराडे यांना फोन करून रडक्या व घाबरलेल्या आवाजात हॉटेल प्रशासने आम्हाला रात्री मारहाण केली असून, आम्हाला काम सोडून आमच्या गावी परत जायचे आहे. कृपया आमची येथून सुटका करण्याची विनवणी केली. या घटनेचे गांभीर्य ओळखत दराडे यांनी पोलिस उपायुक्त विजय खरात यांना याबाबत माहिती दिली. इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईणकर आणि सहकाऱ्यांनी या युवक व युवतींशी भेट घेत त्यांना तेथून त्यांचे सामान घेऊन गेट बाहेर आणले. कुणाला काही तक्रार द्यायची आहे काय, असे पोलिसांनी या सर्वांना विचारले. मात्र त्या सर्वांनी कोणतीही तक्रार द्यायची नाही, तर घरी जायचे आहे, असा सूर लावल्याने पोलिसांची गाडी बोलावून या सर्वांना नाशिक रोड रेल्वेस्थानकावर सोडण्यात आले.
...
मला मंत्री आव्हाड यांचा फोन आल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन पोलिस उपायुक्त खरात यांची मदत घेतली. त्यापैकी एका युवतीने माझ्याकडे कैफियत मांडली आहे. शहरातील नामांकित हॉटेलमध्ये सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक झाली आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी नाशिक पोलिस आयुक्तांकडे करणार आहे. - बाळा दराडे 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख