`या` तालुक्यात सुरु आहे महिलाराज, नागरिकाकंडून मिळतेय प्रोत्साहन! - Womens on all prominant political places In Niphad | Politics Marathi News - Sarkarnama

`या` तालुक्यात सुरु आहे महिलाराज, नागरिकाकंडून मिळतेय प्रोत्साहन!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

निफाड तालुक्यात प्रशासन व राजकारणातील सर्व पदांवर सध्या महिला विराजमान आहेत. विशेष म्हणजे त्यांना नागरिकांचेही प्रोत्साहन मिळत असून यातील आर्कीटेक्ट अमृता पवार या तर सर्वाधिक मते मिळवून विजयी झालेल्या आहेत.

नाशिक : महिला आरक्षणामुळे राजकारणात अनेक बदल झालेले दिसतात. राजकीय कार्यकर्ते, नेत्यांची मानसिकता देखील बदलत आहे. याचे चांगले उदाहरण निफाड तालुक्यात पहायला मिळते. या तालुक्यात प्रशासन व राजकारणातील सर्व पदांवर सध्या महिला विराजमान आहेत. विशेष म्हणजे त्यांना नागरिकांचेही प्रोत्साहन मिळत असून यातील आर्कीटेक्ट अमृता पवार या जिल्ह्यात सर्वाधिक चौदा हजार मते मिळवून विजयी झालेल्या आहेत.

राज्यातील आघाडीची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस म्हणून निलीमाताई पवार विराजमान आहेत. हे जिल्ह्यातील प्रतिष्ठेचे पद मानले जाते. त्यांना (कै.) डॅा वसंतराव पवार यांचा वारसा आहे. मात्र त्यांनी व्यक्तीशः विविध निर्णय घेऊन आपला प्रभाव निर्माण केला आहे.  या तालुक्याचा समावेष दिंडोरी लोकसभा मतदारसंघात होतो. येथे भाजपच्या भारती पवार खासदार आहेत. रत्नाताई संगमनेरे या पंचायत समितीच्या सभापती आहेत. त्यांचा तसा तालुक्याशी थेट संबंध नाही. मात्र हा तालुका त्यांच्याच मतदारसंघात येतो.

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या सभापती म्हणून सुवर्णा जगताप काम पहात आहेत. बाजार समितीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच येथे महिलेला संधी मिळाली आहे. त्या अभियंता आहेत. प्रिती बोरगुडे उपसभापती आहेत.  स्वाती गाजरे या निफाड नगरपंचायतच्या अध्यक्षा आहेत.   

आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदिकिनी या २०१२ पासून जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. त्या सप्तश्रृंगी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या २००४ पासून संस्थापक चेअरमन आहेत. पिंपळगाव बसवंत शेतकरी विविध कार्यकारी विकास सहकारी संस्थेच्या संचालक आहेत. तर श्रीमती अलका अशोकराव बनकर या तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत थेट सरपंचपदी निवडून आल्या आहेत. वास्तूविशारद अमृता पवार या देवगाव जिल्हा परिषद गटातून जिल्ह्यात सर्वाधिक चौदा हजार मते मिळवून विजयी झाल्या आहेत. त्या गोदावरी नागरी सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा देखील आहेत. डॅा अर्चना पठारे या निफाडच्या उपविभागीय अधिकारी आहेत. निफाडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या देवचक्के आहेत. कल्पना निकुंभ या नायब तहसीलदार आहेत. 

निफाड हा राजकीय, सहकार, शिक्षण क्षेत्रात नावाजलेला मानला जातो. येथील शेती प्रगतशील आहेत. द्राक्ष, कांदा, टोमॅटो, भाजीपाला, ऊस हे येथील प्रमुख पिके असल्याने निफाडला श्रीमंतीची शतकाची परंपरा आहे. सहकार, राजकीय क्षेत्रातील नेते मराठा विद्या प्रसाक संस्थेचे संस्थापक, (कै) कर्मवीर गणपत दादा मोरे, (कै) काकासाहेब वाघ, तत्कालीन अध्यक्ष कर्मवीर दुलाजी नाना सीताराम पाटील, राज्य साखर संघाचे तत्कालीन अध्यक्ष (कै) तात्यासाहेब बोरस्ते, माजी आमदार (कै) मालोजीराव मोगल, (कै) रावसाहेब कदम, तत्कालीन अध्यक्ष कर्मवीर दुलाजी नाना सीताराम पाटील, (कै) प्रल्हाद पाटील कराड, शेतकरी संघटनेचे संस्थापक (कै)माधवराव मोरे, माजी मंत्री (कै) विनायक दादा पाटील, ज्येष्ठ नेते (कै)नामदेवराव बनकर, कर्मवीस डॅा वसंतराव पवार यांसह अनेक नेत्यांनी तालुका, जिल्हा व राज्याच्या राजकारणात योगदान दिलेले आहे. विद्यमान श्रीमती निलीमाताई पवार, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, यतीन कदम आदी नेते त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. 
...  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख