फडणवीसांनी येताना रेमडेसिव्हिर का नाही आणले? - Why not Fadanvis brings Remdacivier, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीसांनी येताना रेमडेसिव्हिर का नाही आणले?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 मे 2021

राष्ट्रवादी कॅांग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी `अखेर नाशिकचे दत्तक पिता अवतरले, मात्र मुंबईहून येताना रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणले असते तर काहीतरी दिलासा मिळाला असता`, अशी टीका केली.

नाशिक :  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नाशिकचा दौरा केला. परिस्थितीची पाहणी केली. मात्र या दौऱ्यावर भाजप विरोधकांनी टिका केली आहे.  राष्ट्रवादी कॅांग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी `अखेर नाशिकचे दत्तक पिता अवतरले, मात्र मुंबईहून येताना रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणले असते तर काहीतरी दिलासा मिळाला असता`, अशी टीका केली.  

शहरात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. त्यामुळे सर्वाधीक रुग्णसंख्येच्या बाबतीत नाशिक देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने नाशिकच्या आरोग्यसेवेचे वाभाडे निघाले आहेत. सुरवातीला रुग्णांना बेड मिळत नव्हते, बेड मिळाले तर ऑक्सिजन अपुरा पडू लागला. ऑक्सिजन मिळाला, तर रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. या परिस्थितीमध्ये महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपकडून मात्र ठोस उपाययोजना झाली नाही, अशी टीका  होत आहे. महापालिका निवडणुकीत २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे नाशिक शहर दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती. परंतु गेल्या चार वर्षांत नाशिकमध्ये ठोस कामे झाली नाहीत.

ते म्हणाले, दत्तक पित्याने नाशिककडे दुर्लक्ष केल्याने नाशिककरांचा भ्रमनिरास झाला. निदान सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये तरी दत्तक पित्याने नाशिककडे लक्ष देणे अपेक्षित होते. नाशिकमध्ये येता आले नाही तरी महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना रुग्णालयांमधील पायाभूत सुविधा भक्कम करणे, बेडची संख्या वाढविणे, व्हेंटिलेटरची व्यवस्था करणे, रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करण्याबरोबरच औषध खरेदी व पुरेसे मनुष्यबळ पुरविण्याच्या सूचना देणे गरजेचे होते. मात्र, कुठल्याही उपाययोजना व त्याबद्दलच्या सूचना केल्या नाही. त्यामुळे नाशिकमध्ये कोरोनाने उच्च पातळी गाठली. संपूर्ण परिस्थिती हाताबाहेर गेली असताना आता नाशिक दत्तक घेतलेल्या राज्यातील विरोधी पक्षनेत्यांना नाशिकची आठवण झाली. ते आले मात्र किमान मुंबईहून येताना दत्तक पित्याने रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजन आणले असते तर बरे झाले असते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख