बिल्डरांकडे हळदी कुंकवाचे वाण मागणारा नगरसेवक कोण? - Who Deemanded money to Builders for Haldi-kumkum, Nashik Politiocs | Politics Marathi News - Sarkarnama

बिल्डरांकडे हळदी कुंकवाचे वाण मागणारा नगरसेवक कोण?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 जानेवारी 2021

महिलांना पुढे करुन हळदी-कुंकवाचे कार्यक्रम जोमात आहे. मात्र नगरसेविकांचे पती या कार्यक्रमांसाठी चक्क बिल्डरांकडे `वाण` मागू लागले आहेत. त्यामुळे बिल्डर त्रस्त असुन वाण मागणारे नगरसेवक कोण? यावर राजकीय कार्यकर्त्यांत चर्चा सुरु आहे.  

सिडको : महापालिका निवडणुकांचे वेध लागल्याने नगरसेवक, इच्छुक सगळेच तयारीला लागले आहे. त्यासाठी महिलांना पुढे करुन हळदी-कुंकवाचे कार्यक्रम जोमात आहे. मात्र नगरसेविकांचे पती या कार्यक्रमांसाठी चक्क बिल्डरांकडे `वाण` मागू लागले आहेत. त्यामुळे बिल्डर त्रस्त असुन वाण मागणारे नगरसेवक कोण? यावर राजकीय कार्यकर्त्यांत चर्चा सुरु आहे.  

शहरात कोणी पक्षाच्या वतीने, कोणी नगरसेविकेच्या तर काही इच्छुक म्हणून  `हळदी-कुंकवाचा` कार्यक्रम करायचा आहे. त्यासाठी आपला रोख अथवा वस्तू (वाण) स्वरूपात योगदान हवे असल्याचा फोनवरून धमकीवजा इशारा नुकताच एका विद्यमान नगरसेविकेच्या पतीने बांधकाम व्यवसायिकाला केल्याचे उघडकीस आले आहे. त्याची सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. नेमका हा झेरॉक्स नगरसेवक कोण? याबाबत नागरिकांमध्ये खुमासदार चर्चा थांबायलाच तयार नाही. त्यामुळे या चर्चेचा पाय फुटुन ती सबंध शहरात पोचली. 
महानगरपालिका निवडणूक अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपली आहे. अशातच निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॅंग्रेस पक्षाकडून सातत्याने बैठका सुरु आहेत. त्यामुळे इच्छुकांनी स्वस्थ बसवेना. कॅलेंडर वाटप, मकर संक्रांतीचे तिळगुळ असो वा सध्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम असे एक ना अनेक कार्यक्रम प्रभागा प्रभागांमध्ये सुरु आहेत. विद्यमान व होऊ इच्छिणारे नगरसेवक सगळ्यांकडूनच त्याची तयारी जोमात आहे. क्षमता असलेले काही स्वबळावर तर काही त्यासाठी प्रायोजक शोधताना दिसून येतात.

एका विद्यमान नगरसेविकेच्या पतीने थेट बांधकाम व्यवसायिकाला फोन करुन हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला वस्तू अथवा रोख स्वरूपात मदत करण्याचा धमकी वजा इशारा दिला. या घटनेची सिडको परिसरात मोठी चर्चा सुरु झाली. हा "झेरॉक्स नगरसेवक" अनेक वादात अडकलेला आहे. त्यामुळे तो नेमका कोण? याबाबत मात्र चर्चेला उधाण आले. अशाच एका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला दिलेल्या पैशांवरून महापौरांच्या दौ-यात नगरसेवकाला नागरिकांनी धक्काबुक्की व शिविगाळ केल्याचे प्रकरण ताजे असतांना ही घटना घडली.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख