धुळे विधान परिषद निवडणूकीत अमरीशभाई पटेलांचे काय होणार?

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यापूर्वी स्थगित झालेली धुळे- नंदुरबार मतदारसंघातील विधान परिषदेची पोटनिवडणुक आज जाहिर झाली. येत्या १ डिसेंबरला माजी मंत्री तथा काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अमरिशभाई पटेल आणि कॅाग्रेसचे उमेदवार अभिजित पाटील यांचे भवितव्य ठरेल.
धुळे विधान परिषद निवडणूकीत अमरीशभाई पटेलांचे काय होणार?

धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यापूर्वी स्थगित झालेली धुळे- नंदुरबार मतदारसंघातील विधान परिषदेची पोटनिवडणुक आज जाहिर झाली. येत्या १ डिसेंबरला माजी मंत्री तथा काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अमरिशभाई पटेल आणि कॅाग्रेसचे उमेदवार अभिजित पाटील यांचे भवितव्य ठरेल. 

या पोटनिवडणुकीसाठी यंदा ५ मार्चला अधिसूचना काढण्यात आली होती. १२ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाले. ३० मार्चला मतदान होणार होते. मात्र, "कोरोना'मुळे एन मतदानाच्या तोंडावर २५ मार्चला कार्यक्रम स्थगितीसह ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता. आज ती स्थगिती उठविण्यात आली. जाहिर कार्यक्रमानुसार एक डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होईल.

निवडणुकीचे वैशिष्ट
माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघाची जागा रिक्त झाली. पोटनिवडणूक जाहीर होताना ती बिनविरोध करण्याचा श्री. पटेल यांसह भाजपचा प्रयत्न होता. मात्र, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार अभिजित पाटील यांनी रिंगणात उडी घेतली. दोन्ही उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यामुळे आता दोन्ही उमेदवारांत हा सरळ सामना आहे. विशेष म्हणजे श्री. पाटील यांचे मोतीलाल पाटील हे भाजपमध्ये असुन शहादा नगर परिषदेचे अध्यक्ष आहेत. मुलगा अभिजित पाटील हे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना महाआघाडीचे उमेदवार असल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.

आरोग्य समन्वयक नेमले
केंद्रीय निवडणूक आयोगाने कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाजासाठी  मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यात धुळे, नंदुरबारचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, डॉ. रघुनाथ भोये यांची आरोग्य समन्वयक अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.

दहा मतदान केंद्रे निश्‍चित
मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात दहा मतदान केंद्रे निश्‍चित केली आहेत. मतदान केंद्रावर सॅनिटायझर, मास्क, ताप तपासणीसाठी थर्मल गन असेल. प्रत्येक केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती असेल. ज्या मतदाराकडे मास्क नसेल त्याला ते केंद्राकडून पुरविले जाईल. थर्मल स्कॅनिंगमध्ये ताप असलेला मतदार आढळला तर त्याला विशिष्ट वेळी आणि सर्वांत शेवटी मतदानाची संधी दिली जाईल.

पक्षीय बलाबल
धुळे महापालिकेतील लोकसंग्राम संघटनेच्या सदस्या हेमा अनिल गोटे व शिंदखेडा नगरपरिषदेतील भाजपचे स्वीकृत सदस्य राजेंद्र भामरे यांनी राजीनामा दिला आहे. धुळे महापालिकेतील भाजपचे स्वीकृत सदस्य सोनल शिंदे यांना निवडणूक खर्च सादर न केल्याने विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे मतदारांची संख्या ४३७ झाली. यामध्ये भाजपचे १९९, कॉंग्रेसचे १५७, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ३६, शिवसेनेचे २०, एमआयएमचे ९, समाजवादी पक्षाचे ४, बसप १, मनसे १ आणि दहा अपक्ष सदस्यांचा समावेश आहे.

दोन्ही जिल्ह्यातील मतदार
स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय मतदार असे, धुळे जिल्हा परिषद ६०, धुळे महापालिका ७७, साक्री नगरपंचायत १९, शिरपूर नगरपरिषद ३४, दोंडाईचा नगरपरिषद२८, शिंदखेडा नगरपंचायत १९, नंदुरबार जिल्हा परिषद ६२, नंदुरबार पालिका ४४, नवापूर पालिका २३, शहादा पालिका ३१, अक्राणी नगरपंचायत १९, तळोदा पालिका २१, एकुण ४३७ मतदार आहेत.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com