नाशिकचे लोकप्रतिनिधी करतात तरी काय?  - What are Nashik People representitives Doing | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकचे लोकप्रतिनिधी करतात तरी काय? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

नाशिक औष्णिक वीज केंद्रातील प्रस्तावित 660 मेगा वॅट क्षमतेचा बदली संच दहा वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पाच्या नंतर प्रस्ताव आलेले प्रकल्प मंजूर झाले. त्या संचामधून वीजेची निर्मिती सुरू झाली, मात्र नाशिकचा प्रकल्प रखडलेलाच आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी करतात तरी काय? असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत.

नाशिक : नाशिक औष्णिक वीज केंद्रातील प्रस्तावित 660 मेगा वॅट क्षमतेचा बदली संच दहा वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पाच्या नंतर प्रस्ताव आलेले प्रकल्प मंजूर झाले. त्या संचामधून वीजेची निर्मिती सुरू झाली, मात्र नाशिकचा प्रकल्प रखडलेलाच आहे. गल्ली ते दिल्ली पर्यंत निवेदन, पत्रव्यवहार करूनही हे काम तसूभरही पुढे सरकले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी करतात तरी काय? असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत. 

यासंदर्भात दशकापासून पाठपुरावा करुनही एकलहगरे वीज प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला आश्वासनांपलीकडे काहीच पदरात पडले नाही, अशी त्यांची भावना आहे. राज्यातील सरकारच्या पक्षाचेच लोकप्रतिनिधी असूनही नाशिकची उपेक्षाच झाली. भविष्यात त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटण्याची शक्‍यता आहे. गेल्या सरकार मधील ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक औष्णिक वीज केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी हे केंद्र प्राधान्याने सुरु करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, की राज्यात औष्णिक प्रकल्प झाल्यास सर्वात आधी नाशिकलाच होईल. मात्र त्यानंतर कोराडी येथील प्रकल्प कार्यन्वीत असतांना, दोन नवीन संचांना मान्यता देण्यात आली.

खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, योगेश घोलप यांनी प्रकल्पासाठी विविध प्रमुखांना व मंत्र्यांना निवेदन देऊन पत्रव्यवहार केला होता. सध्याच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे याही सत्ताधारी पक्षाच्या आहेत. मात्र अद्याप त्या चाचपडतांना दिसतात. फक्त कागदी घोडे हलविणे व निवेदनांपलीकडे हालचाल दिसून येत नाही. त्यांनी एकलहरे प्रकल्पासाठी निवेदन दिले होते. त्या निवेदनाची सद्यस्थिती काय, याचा जागरुक पाठपुरावा व फॉलोअप ठेवला असता, तर उरण येथील प्रकल्पाच्या हालचाल्या लक्षात आल्या असत्या. त्यामुळे नाशिकच्या प्रकल्पाला न्याय मिळू शकला असता. 

लोकप्रतिनिधींची ही स्थिती पाहता, आता नागरिकांना केवळ जिल्ह्याचे हेवी वेट नेते, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडूनच अपेक्षा आहेत. श्री. भुजबळ कधी काळी गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या शक्तीमान अशी मुद्रा असलेला नाशिक औष्णिक वीज केंद्राबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. मुंबईचा वाढता विस्तार, वीजेची भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता एकलहरे येथे प्रकल्प होणे आवश्‍यक आहे. त्याचा स्थानिक नागिरकांना रोजगार, परिसराचा विकास आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. उरण वायू केंद्र येथे एक हजार मेगा वॅटचा प्रकल्प घोषित केला गेला. याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार नाशिक बाबत काय निर्णय घेते, याची उत्सुकता वाढत आहे. 
... 
सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असतांना देखील नाशिक येथील बदली संचासाठी सरकार कानाडोळा करतंय, याचा अर्थ नाशिक येथील लोकप्रतिनिधी पाठपुरावा करण्यासाठी कमी पडतात. त्यामुळे सध्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सुद्धा उग्र असे आंदोलन उभारण्याची गरज आहे. 
- विनायक हारक, कार्याध्यक्ष, प्रकल्प बचाव संघर्ष समिती. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख