नाशिक : कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही हातपाय पसरत आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यासाठी आज 50 खाटांचे रुग्णालय सुरू झाले. मात्र तत्कालीन आरोग्यमंत्री विमल मुदंडा याच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे 2008 ला हे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले होते. मध्यंतरी त्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. मात्र ते सुरू होण्यास कोरोनाचा संसर्ग झाला, तेव्हा मुहूर्त सापडला. रुग्णालयाचे कामकाज सुरू होण्यास तब्बल एक तप लागले.
पिंपळगाव बसवंत येथील पन्नास खाटांच्या "कोविड-19' रुगणालयाचे कामकाज बुधवारी (ता. 2) आमदार दिलीप बनकर यांनी अनौपचारिक उद्घाटन करून सुरू केले. निफाड तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तालुक्यात लासलगाव येथे तीस खाटांचे कोविड सेंटर कार्यरत आहे. रुग्णाची संख्या विचारात घेता, कोरोनाबाधितांना चांगले उपचार मिळावेत, ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज असेल त्यांच्यावर तालुक्यातच उपचार केले जावेत, यासाठी पिंपळगाव बसवंतमध्ये नव्याने बांधकाम केलेले ग्रामीण रुग्णालय तालुक्यातील "कोविड-19' सेंटर म्हणून आजपासून कार्यान्वित झाले.
निफाड तालुक्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाले. शिवसेनेचे अनिल कदम यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप बनकर विजयी झाले. यापूर्वी 2004 ते 2009 यादरम्यान श्री. बनकर आमदार होते. त्यानंतर सलग दोन टर्म शिवसेनेचे कदम आमदार होते. त्यामुळे श्री. बनकर यांनी मंजुरी मिळवलेले रुग्णालय सुरू होतानाही पुन्हा श्री. बनकर हेच आमदार असल्याचा राजकीय योगायोग विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.
त्यामुळे आज झालेल्या कार्यक्रमाला राजकीय संदर्भ व अर्थ आहेत. तालुक्यात सध्या कोरोनाची दिवसागणिक वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता पिंपळगावात नव्याने बांधकाम झालेल्या पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयाचे उर्वरित काम तातडीने मार्गी लावून तालुक्यातील रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी ऑक्सिजनसह पन्नास खाटांचे रुग्णालय सुरू झाले. या वेळी महसूल, आरोग्य विभागासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनंत पवार, जिल्हा आरोग्याधिकारी कपिल आहेर, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तालुका आरोग्याधिकारी चेतन काळे, विश्वास मोरे, उपअभियंता महेश पाटील, निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन मोरे आदी उपस्थित होते.
...
https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

