ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून ६५ कोटींची बम्पर लॅाटरी  - Village panchayat will get 65 cr from finance comission | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून ६५ कोटींची बम्पर लॅाटरी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

जिल्हा परिषदेस पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ८२ कोटींचा निधी उपलब्ध प्राप्त झाला. या निधीतून ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना, तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना प्रत्येकी दहा टक्के निधी देण्याच्या सरकारच्या सूचना आहेत.

नाशिक : जिल्हा परिषदेस पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ८२ कोटींचा निधी उपलब्ध प्राप्त झाला. या निधीतून ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना, तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना प्रत्येकी दहा टक्के निधी देण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार ३८५ ग्रामपंचायतींना ६५ कोटी ६३ लाखांचा निधी वितरित झाल्याने त्यांना बम्पर लॅाटरी लागली आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गावातील सध्याच्या परिस्थितीचे विश्‍लेषण करून गावाच्या गरजा ओळखून कामे घेण्याबाबत ग्रामपंचायतींनी कामे सूचवाची आहेत. ग्रामविकासाची मंजूर कृती आराखड्यातील अत्यावश्यक कामे सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घेण्यात येऊन निधी विहित वेळेत खर्च करायचा आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर प्राप्त निधीतून सरकारच्या निधी खर्चाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर निधी वितरण व विकासकामे हाती घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.

ग्रामपंचायतस्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची असणार आहे. ग्रामपंचायतस्तरावर विकासकामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे कृती आराखड्यातील मंजूर असलेली विकासकामे सुरू करण्यास विलंब होत होता. जिल्ह्यात मार्च २०२० पासून आजतागायत कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात विकासकामांवर मोठा परिणाम झालेला होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पंचायतराज संस्थांनी ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यानुसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. जिल्हा परिषदेस पंधरावा वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींचे वेगळे बँक खाते ग्रामपंचायतस्तरावर तयार करण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीस त्यांच्या हिश्‍श्‍याचा पहिल्या हप्त्याचा निधी वितरण करण्यात आल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले.

तत्काळ ग्रामपंचायतस्तरावर वितरण

यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड म्हणाल्या, जिल्हा परिषदस्तरावर पंधराव्या वित्त आयोगांतर्गत वेळोवेळी प्राप्त होणारा निधी तत्काळ ग्रामपंचायतस्तरावर वितरित केला जाईल. वितरित करण्यात आलेला निधी खर्चाबाबत नियोजन करून जनहिताची कामे सदर निधीतून विहीत वेळेत होतील, याबाबत गटविकास अधिकारी यांनी संनियंत्रण करावे.
...

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख