Vijay Kale rescued from Thailand, says hemant godse help me like a GOD | Sarkarnama

अश्रू अनावर झालेले विजय काळे म्हणाले, `आदित्य ठाकरे, हेमंत गोडसे माझ्यासाठी देवासारखे धाऊन आले'

संपत देवगिरे
शनिवार, 23 मे 2020

घरी परतल्यावर अश्रू अनावर झालेले काळे यांनी " आदित्य ठाकरे आणि खासदार गोडसे माझ्यासाठी देवासारखे धाऊन आले. त्यामुळेच मी घरी परतलो' अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. 

नाशिक : कोरोनामुळे गेले दोन महिने थायलंड येथे अडकलेले येथील विजय काळे आता घरी परतले आहेत. पैसे संपल्यावर अन्‌ भारत सरकारने सुरु केलेल्या एअरलिफ्टींग सुविधेतील विमानात जागाच न मिळाल्याने हताश झालेल्या काळे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क केला होता. त्यानंतर खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांमुळे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट परराष्ट्र सचिवांना पत्र लिहून श्री. काळे यांना साह्य करण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेत श्री. काळे आता स्वगृही परतले आहेत. घरी परतल्यावर अश्रू अनावर झालेले काळे यांनी " आदित्य ठाकरे आणि खासदार गोडसे माझ्यासाठी देवासारखे धाऊन आले. त्यामुळेच मी घरी परतलो' अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. 

श्री. काळे नोकरीच्या कामानिमित्त 1 मार्चला थायलंडला गेले होते. याच सुमारास विविध देशांत कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरू झाल्यावर थायलंडसह जगभरात लॉकडाउनची घोषणा झाली. तेव्हा नाशिकचे रहिवासी असलेले विजय काळे थायलंडमध्ये बॅंकॉक शहरात अडकले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच गेला. त्यामुळे लॉकडाउनचा कालावधी देखील वाढत गेला. त्यामुळे जगभरातील विमान कंपन्यांनी विमानसेवा बंद केली. दिड महिना उलटल्यावर श्री. काळे यांच्या जवळचे पैसे देखील संपले होते. त्यामुळे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल सोसावे लागत होते.

श्री. काळे यांनी, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता, खासदार गोडसे यांनी नाशिकच्या श्री. काळे यांना स्वगृही आणण्यासाठी त्वरित पाठपुरावा सुरू केला. यावेळी खासदार गोडसे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी समनव्य साधून काळे यांना भारतात परत आणायची मोहीम यशस्वीरित्या पार केली. त्यांच्या मागणीवरुन राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील परराष्ट्र सचिवांना वंदे भारत योजनेंतर्गत सुरु झालेल्या एअरलिफ्टींगमध्ये श्री. काळे यांचा समावेष होत नाही. त्यातील अडचणी सोडविण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेऊन श्री. काळे यांना भारतीय वकिलातीतील अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. त्यांना भारतात परतायची सोय झाली. आता श्री. काळे आपल्या घरी पोहोचले आहेत. 

घरी पोहोचल्यावर अश्रू अनावर झालेल्या श्री. काळे यांनी आपल्याला आलेल्या अडचणींचा पाढचा वाचला. कोरोनाच्या संकटामुळे माणुसकी शिल्लक राहिलेली नाही. सगळीकडे अविश्‍वासामुळे अनेक अडचणी येत होत्या. यामध्ये कोणीही मदत करण्यास तयार नव्हते. नाशिक रोडचे हेमंत गायकवाड यांनी मला धरी दिला. त्यानंतर खासदार गोडसे यांच्याशी संपर्क करुन दिला. हेमंत गायकवाड आणि खासदार हेमंत गोडसे माझ्यासाठी देवासारखे धाऊन आले. त्यामुळेच कोरोनाच्या विळख्यातून मी घरी परतलो. आपले सहकारी शिवम पाटील, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारचे त्यांनी आभार मानले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख