नाशिक : आदिवासी गौरव दिन साजरा करताना आदिवासी जमातीच्या वैचारिक जडण-घडण आणि सर्वांगीण विकासासाठी हा दिवस ‘आदिवासी विकास मंथन दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे मत राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी व्यक्त केले.
दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारा जागतिक आदिवासी गौरव दिन आज कोरोनामुळे ऑनलाईन पध्दतीने साजरा झाला. यावेळी ॲड. पाडवी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, प्रधान सचिव विनिता सिंघल आदी सहभागी झाले.
ॲड. पाडवी म्हणाले, बोगस आदिवासांना आळा घालण्यासाठी त्याचबरोबर या जमातीच्या उद्योगांना चालना देण्यासाठी ‘आदिवासी हित संरक्षण कक्षाची ’ स्थापना करण्यात येणार आहे. सिकलसेल व इतर आजरांपासून आदिवासींचे रक्षण करण्यासाठी ‘आदिवासी आरोग्य संवर्धन कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे. आदिवासींचा आणि निसर्गाचा खूप जवळचा संबंध असल्याने या जमातीसाठी निर्सगाशी संबंधित एक त्रैमासिक सुरु करावे असा विचार श्री. पाडवी यांनी बोलून दाखवला.
आदिवासी विद्यार्थ्यांना नागरी सेवा परिक्षेच्या प्रवाहात आणण्यासाठी दिल्ली येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु करावे, जेणेकरुन त्यांना स्पर्धा परिक्षेचे वातावरण अनुभवता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क आकारण्यात यावे असेही श्री. पाडवी यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लॉकडाऊन मध्ये जे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले त्याचे श्री. पाडवी यांनी कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते शिक्षणरथ, आणि अनलॉक लर्निंग शासकीय आश्रमशाळा यांसह विविध प्रकल्पांचे उद्घाटन झाले.
आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, नाशिकचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, आदिवासी अपर आयुक्त गिरीष सरोदे, व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, अपर आयुक्त गिरीष सरोदे, सुचिता लासुरे, प्रकल्प अधिकारी वसुमन पंत सहभागी झाले. वेबकास्टद्वारे राज्यातील गावपातळीवरील दोन हजाराहून अधिक आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
....
https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

