नाशिक : पिंपळगाव घाडगाव (ता. इगतपुरी) येथे आज सरपंच देविदास देवगिरे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत कार्यालयाचे शिपाई गंगाराम मोरे यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. यावेळी त्यांनी गावातील प्रत्येक घरापुढे एक अशी एक हजार झाडे लावली. झाडे जगवेल त्यांना घरपट्टी माफ अशी घोषणा केली. अशा प्रकारच्या योजनेसाठी पुढाकार घेणारे हे एकमेव गाव असल्याचा दावा त्यांनी केला.
विविध आगळ्या वेगळ्या उपक्रमांसाठी नावाजलेल्या येथील पिंपळगाव घाडगा येथे आज ७४ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. यावेळी पहिल्यांदाच ग्रामपंचायतचे शिपाई गंगाराम मोरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी सरपंचाच्या योगदानातून गावातील शाळेच्या संरक्षक भिंतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कोरोना योध्दे, कार्यकर्ते यांचा सत्कार झाला. गावाच्या इतिहासात पहिल्यांदात असा उपक्रम झाला. कदाचित राज्यात ग्रामपंचायत शिपाई ध्वजवंदन करणारे हे आगळे वेगळे व एकमेव गाव असावे, असा दावा त्यांनी केला.
यावेळी सरपंच देवगिरे यांच्या संकल्पनेतून गावात एक हजार वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये गावातील प्रत्येक घरापुढे झाड लावण्यात आले. यामध्ये गावातील प्रत्येकाचे योगदान असावे, यासाठी प्रत्येक घरापुढे लावलेल्या झाडाचे छायाचित्र काढण्यात आले आहे. पुढच्या वर्षी हे झाड वाढलेले असल्यास झाडाचे जतन करणा-या ग्रामस्थाला घऱपट्टी माफ करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सॅमसोनाईट कंपनीतर्फे दक्षिण आशिया उपाध्यक्ष यशवंत सिंग यांच्यातर्फे शंभर रोपे व वृक्षसंरक्षक जाळ्या देण्यात आल्या आहेत.
सरपंच देवगिरे यांनी कोरोना संसर्गाच्या काळात ग्रामस्थ तसेच नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांनी या काळात बाजार समितीत आपल्या शेतीतल सर्व कांदा विक्री करुन त्याचे सर्व एकावन्न हजार रुपये तसेच अकरा हजार रुपये सकाळ रिलीफ फंडला दिले होते. बाजार समिती बंद असल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले होते. त्यावेळी त्यांनी स्वखर्चाने हा भाजीपाला शहरात नेऊन त्याचे नागरिकांना ोमफत वाटप केले होते. ते सातत्याने विविध नाविण्यपूर्ण उपक्रम ते राबवित असतात.
यावेळी शिक्षक श्री. गारे, उपसरपंच मंगेश मेंगाळ, राजु गोडे, संदिप घाडगे, ज्ञानेश्वर आहेर, भाऊसाहेब भामरे, मुख्याध्यापक टोचे, सौ. आहिरे, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी आहेर, अंजना जोशी, सिमा देवगिरे, बहिरु घाडगे, कैलास घाडगे उपस्थित होते.
https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

