...तर पाण्यासाठी कालवा समिती बैठकांची गरजच राहणार नाही! - Then need not required canol committee meetings | Politics Marathi News - Sarkarnama

...तर पाण्यासाठी कालवा समिती बैठकांची गरजच राहणार नाही!

संपत देवगिरे
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसावर महाराष्ट्राचा हक्क आहे. पाणी वाटपात ज्या पाण्याचा हिशोब धरला नाही, हे पाणी वळवले तर नगर, मराठवाड्याचा सिंचनाचा प्रश्न सुटेल, पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीची गरजच पडणार नाही, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

 

ते अडवून पश्चिम भागातील पाणी येवला, वैजापूरकडे वळवणार असून उपलब्ध पाण्यातून योग्यप्रकारे आवर्तनाचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज कोपरगांव येथे केले.

नाशिक : महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसावर महाराष्ट्राचा हक्क आहे. पाणी वाटपात ज्या पाण्याचा हिशोब धरला नाही, ते अडवून पश्चिम भागातील पाणी येवला, वैजापूरकडे वळवणार असून उपलब्ध पाण्यातून योग्यप्रकारे आवर्तनाचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज कोपरगांव येथे केले. 

कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात गोदावरी डावा तट कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या जमिनीवर पडणाऱ्या पाण्यावर महाराष्ट्राचा अधिकार आहे. मात्र याठिकाणी डोंगर अधिक असल्याने हे पाणी गुजरातला वाहून जाते. यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आपण लढा देत आहोत. गुजरातमध्ये जाणारे हे पाणी गुजरातला न जाता  हे पाणी महाराष्ट्रात वळविल्यानंतर नाशिक अहमदनगरसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. 

ते म्हणाले, पश्मिम वाहिनी नद्यांचे गुजरातला वाहून जाणारे पाणी तिकडे जावू न देता हे पाणी महाराष्ट्रात वळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हे पाणी आल्यानंतर  कालवा सल्लागार समितीच्या बैठका घेण्याची गरज पडणार नाही. पाण्याचा साठा कसा वाढेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसे केल्यास  प्रांता प्रांतातील वाद संपुष्टात येतील. त्यासाठी वाहून जाणारे पाणी अडविण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या पाच वर्षात कालव्याची दुरुस्ती न झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी आपण सोडविण्यास कटिबद्ध असून राहिलेले विकास कामे लवकरात लवकर करण्यात येतील.

दिवाळीला जबाबदारीची किनार
आपलं कुटुंब ही आपली जबाबदारी आहे.देशातून आणि जगातून जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही तोपर्यंत कोरोनाबाबत काळजी नागरिकांनी घ्यावी. दिवाळी आनंदात साजरी करावी मात्र या दिवाळीला जबाबदारीची किनार आहे त्याचा नागरिकांनी आवश्य विचार करावा. कोरोनामुळे शेतकऱ्यांसह सर्व लोक अडचणीत आले आहे. अनेकांना राज्यराज्यात स्थलांतर करावे लागले. त्यात अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. कोरोनाचा फटका नागरिकांसोबत शासनालाही बसला आहे. पंरतु अशाही परिस्थितीतही शासनाचे नागरिकांना वाचविण्यासाठी प्राधान्य असल्याने आरोग्य, अन्न धान्य आणि पोलीस विभागावर खर्च करण्यात येत आहे. २५ ते ३० हजार कोटी रुपये जीएसटीचे पैसे केंद्र सरकारकडून येणे बाकी आहे. हे अर्थ चक्र आता पुन्हा सुरू होत असून हळूहळू सरकारच्या तिजोरीत पैसे येतील आणि नागरिकांची कामे होतील असा विश्वास मंत्री श्री. भुजबळ यांनी व्यक्त केला. 

उन्हाळ्यात तीन रोटेशन हवेत : काळे 
आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगाव मध्ये झाल्याने शेतकऱ्यांना आपले प्रश्न मांडता आले आहे. गोदावरी कालव्याचे पश्चिमेकडील पाणी कोपरगाव पूर्वेकडे वळावे ही अनेक दिवसांची मागणी असून या मागणीचा शासन स्तरावर विचार करण्यात यावा. सद्या पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने रब्बीचे आवर्तन न देता उन्हाळ्यात तीन रोटेशन देण्याचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

या बैठकिस आमदार आशुतोष काळे, शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सुधाकर रोहम, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, पदमकांत कुदळे, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, तहसिलदार योगेश चंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे  यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख