आमदार दिलीप बनकर म्हणतात, दहा दिवस ‘जनता कर्फ्यू’ पाळा

रुग्णांची संख्या पाहता बेड, ऑक्सिजनची कमतरता भासत असून, नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारपासून दहा दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ पिंपळगाव शहरात लागू होत आहे. नागरिकांच्या हितासाठी कर्फ्यूला जनतेने साथ द्यावी, असे आवाहन आमदार दिलीप बनकर यांनी केले.
Dilip Bankar
Dilip Bankar

पिंपळगाव बसवंत : राज्य शासनाने सुरू केलेल्या लॉकडाउनला सुरवातीचे दोन दिवस वगळता पिंपळगावमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनाच्या चक्रव्यूहात अडकण्यासाठी हे पोषक वातावरण आहे. आठ दिवसांत होत असलेल्या मृत्यूने काळजाचा थरकाप उडत आहे. रुग्णांची संख्या पाहता बेड, ऑक्सिजनची कमतरता भासत असून, नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारपासून दहा दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ पिंपळगाव शहरात लागू होत आहे. नागरिकांच्या हितासाठी कर्फ्यूला जनतेने साथ द्यावी, असे आवाहन आमदार दिलीप बनकर यांनी केले.

पिंपळगाव शहरात कोरोनाचा आवळला जात असलेला फास तोडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर यांच्या संकल्पनेतून सर्वपक्षीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी आमदार बनकर बोलत होते. तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड उपस्थित होते.

आमदार बनकर म्हणाले, की कोरोनाने जिवाभावाची माणसं गमावण्याचा प्रसंग ओढावत आहे. संपत्ती कमावण्यापेक्षा आता माणसं वाचविणे गरजेचे आहे. त्यासाठी हा कर्फ्यू असून, घरातच थांबण्याचे आवाहन त्यांनी केले.

तहसीलदार शरद घोरपडे म्हणाले, की पिंपळगाव हे मुख्य बाजारपेठेचे शहर असून, सोशल डिस्टन्सिंगसह नागरिक नियम गांभीर्याने पाळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. ‘जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने कोरोनाला शहरातून हद्दपार करण्याची संधी असून, प्रशासन सोबत आहे.

गणेश बनकर म्हणाले, की कोरोनाचा रुद्रावतार एवढा भयावह आहे, की रोज बेड, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरसाठी नागरिक याचना करीत आहेत. मृत्यूचे तांडव मन सुन्न करत आहे. त्यामुळे कोरोनाच्या विळख्यातून जनतेला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हा ‘जनता कर्फ्यू’ आहे. मंडळ अधिकारी निळकंठ उगले, ग्रामविकास अधिकारी एल. जे. जंगम, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे, डॉ. योगेश धनवटे, पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे, उपसरपंच सुहास मोरे, संजय मोरे, सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, रामभाऊ माळोदे, प्रकाश गोसावी, अल्पेश पारख, दीपक विधाते, किरण लभडे, संदीप कागदे, रामकृष्ण खोडे, अकुंश वारडे आदी उपस्थित होते.

असा असेल ‘जनता कर्फ्यू’
दूध वितरण रोज सकाळी सहा ते नऊपर्यंत. सोमवार ते शुक्रवार दुपारी दोन ते पाच या वेळेत भाजीपाल्याची उपनगरामध्ये हातगाड्यावर विक्री. कृषी निविष्ठा विक्री दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत. बुधवार व शुक्रवार दुपारी दोन ते पाचपर्यंत मटण, चिकन व मांसविक्री. वैद्यकीय सेवा सर्व दिवस सुरू राहील. तर इतर दुकाने शनिवार व रविवारी पूर्ण बंद असतील.
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com