स्वाभिमानी शेतकरी संघटना का म्हणते, "जनतेचा उद्रेक होईल' - Swabhimani Shetkari sanghtana burns Extra charged Electricity bills | Politics Marathi News - Sarkarnama

स्वाभिमानी शेतकरी संघटना का म्हणते, "जनतेचा उद्रेक होईल'

संपत देवगिरे
सोमवार, 13 जुलै 2020

वीज कंपनीने राज्यभर वाढीव दराने ग्राहकांना ही बिले दिली आहेत. कोरोनामुळे शेतकरी, कामगार, व्यावसायिक, मजूर आधीच त्रस्त आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यात ही वाढीव बिले देऊन वीज मंडळाने जखमेवर मीठ चोळले आहे. 

नाशिक  : कोरोनाच्या लॉकडाउन काळातील तीन महिन्यांचे घरगुती वीज बिल अव्वाच्या सव्वा आहे. वीज कंपनीने राज्यभर वाढीव दराने ग्राहकांना ही बिले दिली आहेत. कोरोनामुळे शेतकरी, कामगार, व्यावसायिक, मजूर आधीच त्रस्त आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यात ही वाढीव बिले देऊन वीज मंडळाने जखमेवर मीठ चोळले आहे. त्याचा सरकारने फेरविचार करावा, अन्यथा जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज येथे दिला. 

संघटनेतर्फे आज दिंडोरी येथे तहसीलदार कार्यालयापुढे आंदोलन करुन, वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे नेते, माजी आमदार रामदार चारोस्कर सहभागी झाले होते. त्यामुळे आजच्या आंदोलनात तो चर्चेचा विषय ठरला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी ते म्हणाले, आज देशातील सर्वसामान्य जनता कोरोनाने पिचली आहे. राज्यामध्ये दुबार पेरणी, खते व औषधांची टंचाई, भाववाढ, बोगस बियाणे, बेरोजगारी या समस्या गंभीर आहेत. त्यात वाढीव वीज वितरण कंपनीने प्रचंड बिले देऊन ग्राहकांच्या गळ्यावरच पाय देण्याचे काम केले आहे. आज जनतेला आधार देण्याची गरज असताना, पेट्रोल डिझेल दरवाढीच्या रुपाने केंद्र शासन व वीज बिलांच्या रूपाने राज्य शासन यांच्यामध्ये जनतेची लूट करण्याची टांगा शर्यत सुरू आहे की काय? असा प्रश्न पडतो. याविषयी जनतेच्या मनात तीव्र भावना आहेत. त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही तीन महिन्याचे वीज बिल शासनाने माफ करावे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला. 

यावेळी गंगाधर निखाडे, प्रांतिक सदस्य सोमनाथ बोराडे, ज्योती देशमुख, दिलीप जाधव, वसंतराव थेटे, वसंत कावळे, गणेश हिरे, राकेश शिंदे, संपत जाधव, अभय सूर्यवंशी, सचिन कड यांसह विविध पक्ष, संघटना, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी सहभागी झाले. 
... 
आज राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल होळी करण्यात आली. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत कंपन्यांनी ग्राहकांना वाढीव वीज बिल देऊन सामान्य जनतेला नाडले आहे. ही बिले रद्द करुन दिल्ली सरकारप्रमाणे कोरोनाच्या तीन महिन्याच्या कालावधीचे वीज बिल माफ करावे. वीजेची दरवाढ देखील मागे घ्यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. 
- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख