धुळे जिल्हा परिषदेतील ओबीसींचे 15 मतदारसंघ रद्द : दोन आठवड्यांत पुन्हा निवडणूक रणधुमाळी

धुळ्यातील भाजपच्या सत्तेला आव्हान मिळण्याची चिन्हे
supreme court ff
supreme court ff

कापडणे : धुळे जिल्हा परिषदेच्या १५ गटांतील निवडणुका नव्याने घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ४) दिले. निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक ७३ टक्के आरक्षण झाले होते. याबाबत बोरकुंडचे प्रकाश पाटील यांनी याचिका दाखल केली होती. तिचा निकाल गुरुवारी लागला.

वर्षभरापूर्वीच निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचे या निकालामुळे धाबे दणाणले आहे. विशेष करून भाजपचे बहुमत असलेल्या जिल्हा परिषदेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. दोन आठवड्यांच्या आत निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीमुळे वातावरण ढवळून निघणार आहे.


धुळे जिल्हा परिषदेची निवडणूक ८ जानेवारी २०२० ला झाली होती. या निवडणुकीत भाजपने ५६ पैकी ३९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणाबाबत बोरकुंड विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने विशेष नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षण कमी केले आहे. ७३ टक्क्यांवरील आरक्षण ५० टक्‍क्‍यांवर आणले आहे. धुळे तालुक्यातील ११ आणि शिंदखेडा तालुक्यातील चार गट सर्वसाधारण जागेसाठी आले आहेत. म्हणजे गटाच्या १५ आणि पंचायत समिती गणाच्या ३० जागांसाठी नव्याने निवडणुकीचा नगारा वाजला आहे.

किरण पाटीलच खरे किंगमेकर
जिल्हा परिषदेचे आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत असावे. ते ७३ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. त्यामुळे सर्वसाधारण जागा कमी झाल्यात. याचा  अभ्यास माजी कृषी सभापती किरण पाटील यांनी केला होता. त्यांनीच ही बाब लक्षात आणून दिली होती. आजचा आरक्षणाच्या निकालामागे पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. किंबहुना आरक्षणातील बदल घडवून आणणारे खरे किंगमेकर पाटीलच आहेत.

धुळे जिल्हा परिषद गटातील मागास प्रवर्गातील जागा सर्वसाधारण जागांमध्ये परावर्तीत होणार आहेत. कापडणे, नेर, कुसुंबा, लामकानी, रतनपुरा, नगाव, फागणे, बोरकुंड, बोरविहीर, शिरूड, नरडाणा, बेटावद, मालपूर व खलाणे. विशेष म्हणजे या गटांमध्ये सत्ताधारी भाजपचे महत्त्वपूर्ण नेतेही निवडून आले आहेत. यात कृषी सभापती बापू खलाणे, महिला व बालकल्याण सभापती धरती देवरे, भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष तथा स्थायी समितीचे सदस्य राम भदाणे, आशितोष पाटील, पंकज कदम यांचा समावेश आहे. दरम्यान, काही गावांमध्ये फटाके फोडत व गुलाल उधळत या निकालाचे स्वागत करण्यात आले.

जिल्हा परिषदेतील पक्षनिहाय बलाबल
-भाजप ३९
-काॅंग्रेस ७
-शिवसेना ४
-राष्ट्रवादी ३
-अपक्ष ३
-एकूण ५६

जि.प.मधील सद्यस्थितील आरक्षण
सर्वसाधारण १५
अनुसूचित जाती ३
अनुसूचित जमाती २३
मागास प्रवर्ग १५
एकूण ५६

ओबीसीच्या १५ जागा सर्वसाधारण जागांमध्ये परावर्तित झाल्या आहेत. दोन आठवड्यांच्या आत निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याचे आदेश आहेत. आरक्षणाचा लढा कोणत्याही जातीविरुद्ध नव्हता. ओबीसीच्या १५ जागा कमी झाल्या आहेत.
-किरण पाटील, माजी कृषी सभापती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com