संजय राऊत म्हणतात, शिवसेनेच्या रक्तातच समाजकार्य  - Social work is In Shivsena`s blood. Nashik Politics, Sanjay Raut Politics | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊत म्हणतात, शिवसेनेच्या रक्तातच समाजकार्य 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

निवडणुका आल्या म्हणून शिवसेना काम करत नाही, शिवसेनेची ती परंपराही नाही. शिवसेनेच्या रक्तातच समाजकार्य आहे, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

नाशिक : निवडणुका आल्या म्हणून शिवसेना काम करत नाही, शिवसेनेची ती परंपराही नाही. शिवसेनेच्या रक्तातच समाजकार्य आहे, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. 

शनिवारी चेतनानगर येथे नगरसेविका संगीता जाधव यांच्या विकासनिधी अंतर्गत सुमारे २० किलोमीटर लांबीच्या १०४ अंतर्गत रस्ते डांबरीकरणाचा प्रारंभ आणि शहीद नितीन भालेराव मार्ग नामकरण सोहळ्यात ते बोलत होते. 

श्री. राऊत म्हणाले, की समाजकारणामुळेच लोक खंबीरपणे शिवसेनेच्या पाठीमागे उभे राहतात. राज्यात नवीन राजकीय पहाट होत आहे. त्या दिशेने आता पुढे गेले पाहिजे. शहिदांचा सन्मान करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यांच्या स्मृती जपल्याने सर्वसामान्यांना प्रेरणा मिळते. २०१७ च्या निवडणुकीत या भागातील शंभर टक्के कॉलनी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल, असे वचन सौ. जाधव यांनी दिले होते. त्याची वचनपूर्ती त्यांनी केली आहे. यावेळी छत्तीसगडमधील सुकमा येथील नक्षली हल्ल्यात शहीद स्थानिक नागरिक असिस्टंट कमांडर नितीन भालेराव यांच्या स्मृतीनिमित्त कानिफनाथनगर येथील रस्त्याचे शहीद नितीन भालेराव मार्ग, असे नामकरण करण्यात आले. या वेळी त्यांच्या आई भारती, पत्नी रश्मी आणि इतर कुटुंबीयांचे राऊत यांनी सांत्वन केले. काही काळ येथील वातावरण भावूक झाले होते. या रस्त्याला ‘शहीद नितीन’ यांचे नाव देण्यात येईल, असे आश्वासन सौ. जाधव आणि माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी त्यांच्या अंतयात्रेदरम्यान नागरिकांना दिले होते. प्रत्यक्षात या आश्वासनाची पूर्तता केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

यावेळी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, योगेश घोलप, दत्ता गायकवाड,माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, नगरसेविका किरण गामणे, वंदना बिरारी, प्रथमेश विभुते, पंडित धात्रक, हेमंत खोंड, छबू नागरे, वसंत पाटील, बाळा दराडे आदी उपस्थित होते.
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख