...म्हणून उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिला : एकनाथ खडसे  - ... so North Maharashtra was deprived of the post of Chief Minister: Eknath Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

...म्हणून उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिला : एकनाथ खडसे 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

आपण फारच वारकरी, सहनशील आहोत. त्यामुळे अन्याय सहन करतो.

धुळे : "उत्तर महाराष्ट्रातील जनता आक्रमक नसल्यानेच हा विभाग मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. शिवाय या विभागात जेथे-जेथे नेतृत्व पुढे आले, त्यांचे वरिष्ठ पातळीवर खच्चीकरण झाल्याचे वाटते. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची भूक पूर्ण होऊ शकली नाही. ती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल,' असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

मुकटी (ता. धुळे) येथे बोलताना खडसे यांनी वरील दावा केला. खडसे म्हणाले, तापी विकास महामंडळाची 1995 मध्ये स्थापना केली. तापी नदीवर बॅरेज झाले. मात्र, पाणी तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोचले नाही. त्यासाठी उपसा सिंचन योजना मंजुरीसाठी प्रयत्न केले. साक्रीतील पांझरा कान साखर कारखाना बंद आहे. असे उत्तर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प मार्गी लावायचे आहेत.

भाजपमध्ये खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री जयकुमार रावल, डॉ. विजयकुमार गावीत, खासदार डॉ. हिना गावीत यांना आणले. अन्यथा, भाजपमध्ये होते कोण? भाजपला मी बहुजन चेहऱ्याची ओळख दिली. तरीही आपल्यापेक्षा कुणी मोठा होऊ नये, असे हीन, किळसवाणे प्रयत्न झाले.

भाजपमध्ये 40 वर्षे काम करताना थकलो, प्रवेशानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये थकणार नाही. हाच पक्ष राज्यासह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची आस पूर्ण करू शकतो, असा दृढ विश्‍वास आहे. 

उत्तर महाराष्ट्रावर अन्याय 

उत्तर महाराष्ट्रात क्षमता नाही का? तर आहे, असे सांगत खडसे यांनी नमूद केले, की विकासात धुळे जिल्ह्यासह खानदेश पुढे गेला नाही. यात ठिकठिकाणाहून जे- जे नेतृत्व आले, त्यांचे वरिष्ठ पातळीवर खच्चीकरण झाले, असे वाटते.

माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी खूप काम केले. ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत गेले. भाऊसाहेब हिरे यांनीही कामे केली, तेही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत गेले. मी (खडसे) मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत गेलो. पण कुणालाही न्याय मिळाला नाही. उत्तर महाराष्ट्र कायम मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिला. मग या विभागाने काही गुन्हा केला का?, तर नाही. गुन्हा या विभागाचा नाही तर तुमचा (जनता) आहे. आपण मुख्यमंत्री पदाची मागणी करत नाही.

आपण फारच वारकरी, सहनशील आहोत. त्यामुळे अन्याय सहन करतो. माझा भाजपमध्ये गेली चार वर्षे छळ झाला. त्यामुळे त्यांना जनतेने जागा दाखवावी, असे आवाहन खडसे यांनी केले. प्राचार्य ईश्वर बडगुजर यांनी प्रास्ताविक केले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख