Shocking...2225 beds are Empty, But NMC says no bed to corona patients | Sarkarnama

धक्कादायक... 2225 खाटा रिकाम्या, कोरोनाग्रस्तांना मात्र जागा नाही !

संपत देवगिरे
मंगळवार, 30 जून 2020

कोरोना ही आपत्ती नव्हे तर सरकारी प्रशासनासाठी "इष्टापत्ती' ठरली की काय? अशी शंका येऊ लागली आहे. कारण खुद्द शासनाच्या व्यवस्थेतील अडीच हजार खाटा रिक्त 
आहे. रुग्णांना मात्र सगळे जागा नाही, असे सांगत त्यांचा फुटबॅाल होत आहे.

नाशिक : कोरोना ही आपत्ती नव्हे तर सरकारी प्रशासनासाठी "इष्टापत्ती' ठरली की काय? अशी शंका येऊ लागली आहे. कारण खुद्द शासनाच्या व्यवस्थेतील अडीच हजार खाटा रिक्त आहेत. रुग्णांना मात्र सगळे जागा नाही, असे सांगत त्यांचा फुटबॅाल करीत आहेत. कोरोनाग्रस्तांशी होणारा खेळ थांबविण्यात शहरातील निद्रीस्त लोकप्रतिनिधी लक्ष घालतील काय? अशी स्थिती आहे. 

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णालयात दाखल होण्यास गेलेल्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारी रुग्णालयात दाखल केले तरीही विशिष्ट रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिल जातो. महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेल्या काही रुग्णांनादेखील असाच अनुभव येत आहे. 

शहरात कोरोनाने प्रवेश केल्यानंतर हळूहळू रौद्ररूप धारण केले. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असलेल्या नाशिक शहरात आता तर शंभराच्या पटीत रुग्ण आढळत आहेत. गेल्या तीन महिन्यांत ही वाढ तब्बल शंभर पटींनी अधिक आहे. अशा पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यातून निर्माण झालेल्या भीतीचे रूपांतर पैशांत करण्यात खासगी रुग्णालयातील डॉक्‍टरांची ही यंत्रणा कार्यान्वित झाली असून, त्याविरोधात "सकाळ'ने आवाज उठविल्यानंतर शिवसेनादेखील मैदानात उतरली. डॉक्‍टर विरुद्ध राजकीय पक्ष, असा सामना सध्या शहरात रंगताना दिसत असतानाच, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना लुटण्याचा हा आणखी नवा प्रकार समोर आला आहे. लुटीच्या या नव्या फंड्यात महापालिकेचे डॉक्‍टरदेखील सहभागी असल्याने ही बाब गंभीर होत आहे. 

शहरात कोरोना रुग्णांसाठी तीन हजार 535 खाटा उपलब्ध आहेत. यातील अवघ्या 1310 खाटांवर रुग्ण आहेत. यातील दोन हजार 225 खाटा रिक्त आहेत. विशेष म्हणजे यामध्ये शहरातील प्रमुख एजन्सी असलेल्या महापालिकेकडे दोन हजार 461 रुग्ण क्षमता आहेत. त्यात केवळ 616 रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार 225 खाटा रिक्त आहेत. गंमत म्हणजे खाजगी रुग्णालयांकडे 830 खाटा आहेत. यात केवळ 103 रुग्ण असून 727 खाटा रिक्‍त आहेत. महापालिकेने आठ ठिकाणी स्वतःची व्यवस्था निर्माण केली आहे. यामध्ये धात्रक फाटा (200), अग्नीशमन केंद्र निवासस्थाने 100), गंगापूर रुग्णालय (40), पंजाबराव देशमुख वसतिगृह (200), समाज कल्याण वसतिगृह (500), तपोवन (40), विल्होळी प्रशिक्षण केंद्र (100) आणि वडाळा (40) अशी 1220 क्षमता असलेले विशेष कोविड 19 उपचार केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यावर फार मोठा खर्च करण्यात आला आहे. अत्यंत महागडे साहित्य येथे देण्यात आले आहे. मात्र तेथे अवघे तीनशे रुग्ण आहेत. यातील 920 खाटा रिकाम्या आहेत. मात्र दैनंदीन अहवाल प्रकाशीत होतांना आकड्यांचा वेगळाच खेळ पहायला मिळतो. शहरात कोरोनाग्रस्तांसाठी जागाच नाही, असे चित्र निर्माण केले जात आहे. प्रत्यक्षात शहराच्या प्रशासनातील कोणीही ग्राऊंडवर उतरलेले नाही. सर्व खेळ कार्यालयात बसुन सुरु आहे. लोकप्रतिनिधींवर ही मोठी जबाबदारी आहे. मात्र कोणीही नगरसेवक, आमदार, खासदार मैदानात दिसत नाही. ही स्थिती नेमकी मालेगाव शहरातील कोरोनाशी दिलेल्या लढ्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे हा गोंधळ थांबवणार कोण? अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचे उत्तर शोधावे लागेल. 
.... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख