मंदिरांसाठी घंटानाद करण्यापेक्षा भाजपने दारापुढचे खड्डे बुजवा ! - Shivsena`s agitation for road issues in nashik city against BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

मंदिरांसाठी घंटानाद करण्यापेक्षा भाजपने दारापुढचे खड्डे बुजवा !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 ऑगस्ट 2020

शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. पावसामुळे त्याची भिषणता आणखी वाढली आहे. नुकतेच डांबरीकरण केलेल्या रस्त्यांर कोट्यावधींचा खर्च झालेला आहे.

नाशिक : शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. पावसामुळे त्याची भिषणता आणखी वाढली आहे. नुकतेच डांबरीकरण केलेल्या रस्त्यांर कोट्यावधींचा खर्च झालेला आहे.या प्रकरणावरुन आता महापालिकेत सत्ताधारी भाजप व विरोधी शिवसेनेत राजकीय आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. 

यासंदर्भात म्हसरुळ येथे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिका स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या प्रभागापासून आंदोलनाची सुरवात केली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी येथे खड्ड्यांत वृक्षारोपण केले.  नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. वाहनधारकांना वाहन चालविण्यासाठी अक्षरक्ष: कसरत करावी लागत आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही महापालिका मात्र खड्डे बुजविण्याबाबत कोणतीही हालचाल करण्यास तयार नाही. याबाबत आंदोलकांनी भाजपवर टिका केली. 

नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तर शिवसेना विरोधीपक्ष आहे. शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत यासाठी शिवसेनेने आंदोलन केले. शिवसेनेच्या पंचवटी विभागातर्फे महापालिकेच्या विरोधात खड्डेमुक्त रस्त्यासाठीची मोहिम प्रभाग 1 पासून सुरु झाली. स्थायी समिती सभापती गणेश गिते या प्रभागाचे नगरसेवक आहेत. शिवसेनेचे महानगरप्रमुख महेश बडवे यांच्या नेतृत्वाखाली मखमालाबाद म्हसरूळ लिंक रोड वर राऊ हॉटेल चॉफुली येथे खड्ड्यात झाडे लावण्यात आली.

यावेळी श्री बडवे म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. प्रभाग एक मधील नगरसेविका शहराच्या महापौर होत्या. दुसऱ्या नगरसेविका सभापती अन्‌ तिसरे नगरसेवक सध्या शहराच्या स्थायी समिती सभापती आहेत. त्यांच्याच प्रभागातील रस्त्यांची अशी अवस्था असेल, तर शहराचे काय होईल?. याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. मंदिरे उघडण्यासाठी भाजपा घंटानाद करीत आहे. "भाजपा'ने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा आपल्या दारासमोरचे खड्डे पहावेत. विकासावर लक्ष केंद्रित करुन खड्डेमुक्त शहर कसे होईल त्याचा विचार करावा, असा टोला त्यांनी हाणला. 

आंदोलनात भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे, दिलीप मोरे, सुनिल निरगुडे, संजय पिंगळे, चांगदेव गुंजाळ, शैलेश सूर्यवंशी, विशाल कदम, स्वाती पाटील, श्रीमती मराठे, सुरेश जाधव, महेंद्र बडवे, विनोद हाटकर, गणेश थेटे, संतोष पेलमहाले यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख