मेट्रो़मुळे नाशिकच्या शिवसेनेत धडकी भऱली ? - Shivsena scared on metro project Announcement. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

मेट्रो़मुळे नाशिकच्या शिवसेनेत धडकी भऱली ?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेचे सर्व स्तरातून स्वागत होत असताना, राजकीय धुराळा उडण्यास सुरवात झाली आहे.

नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेचे सर्व स्तरातून स्वागत होत असताना, राजकीय धुराळा उडण्यास सुरवात झाली आहे. या माध्यमातून पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपला फायदा होईल का या शंकेने शिवसेनेत धडकी भरली आहे.

पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार असून, त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महापालिकेत सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची संधी शिवसेनेकडून सोडली जात नाही. सद्यःस्थितीत शिवसेनेचे पारडे जड झाले होते. भाजपमधून काही मोठ्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षाची ताकद वाढली आहे. अंतर्गत हेवेदावे, महापालिकेतील राजकारणामुळे भाजपमध्ये मरगळ निर्माण झाली. २०१७ च्या महापालिका निवडणूक प्रचारात तत्कलीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली. मात्र, चार वर्षांत विकासाचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य न करता आल्याने आगामी निवडणुकीत भाजपला याच मुद्यावरून घेरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मात्र, नाशिक मेट्रोची घोषणा झाल्याने भाजपमधील मरगळ झटकली गेल्याचे दिसून आले, तर शिवसेनेत काहीसा चिंतेचा सूर आहे.

गेल्या निवडणुकीतच शिवसेनेने मोठा जोर लावला होता. भाजपने केलेला चार सदस्यांचा प्रभाग व प्रचंड सादनसामग्री याचा मुकाबला करीत शिवसेनेला पस्तीस जागा मिळाल्या होत्या. तेव्हा नेत्यांतील विसंवादामुळे शिवसेनेची संधी हुकली असे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर स्वबळावर सत्तेत असलेल्या भाजपविषयी मोठ्या प्रमाणात नाराजी होती. जवळपास अकरा नगरसेवक पक्ष सोडून शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत ही नाराजी दुर करण्यात मेट्रोच्या मंजुरीमुळे भाजपला सावरण्याची संधी मिळाली आहे, असे म्हणता येईल. 

दत्तक विधानाला जागलो : महापौर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक मेट्रो प्रकल्प केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतल्याबद्दल महापौर नात्याने त्यांचे अभिनंदन. विकासाच्या दृष्टीने प्रकल्प महत्त्वाचा आहे. भारतातील पहिली निओ मेट्रो नाशिकमध्ये होणार आहे. प्रकल्पासाठी श्री. फडणवीस यांनी जो शब्द दिला होता, तो पूर्ण करून दाखविला. यामुळे नाशिकच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. नाशिक- मुंबई- पुणे या सुवर्ण त्रिकोणाला आणखी झळाळी मिळेल, असा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला.

महापौरांचे ज्ञान अर्धवट
महापौर सतीश कुलकर्णी अपूर्ण माहितीच्या आधारे शिवसेनेकडून प्रस्ताव अडविल्याचा चुकीचा आरोप करीत होते. हे यानिमित्त स्पष्ट झाले. शिवसेनेने प्रस्ताव अडविला होता, तर केंद्र शासनाने मंजुरी कशी दिली? यापुढे अर्धवट ज्ञानाचे प्रदर्शन करण्यापेक्षा किमान अभ्यास करून बोलावे. सूडाचे राजकारण न करता नाशिकच्या विकासासाठी राज्य सरकारने केंद्राला तत्काळ प्रस्ताव पाठविला. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले पाहिजे असे महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. 
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख