सिन्नरच्या पारनेर पॅटर्नने शिवसेना नेत्यांचा तीळपापड झाला ! - Shivsena leaders angree on corporators spleat in Sinner | Politics Marathi News - Sarkarnama

सिन्नरच्या पारनेर पॅटर्नने शिवसेना नेत्यांचा तीळपापड झाला !

संपत देवगिरे
गुरुवार, 30 जुलै 2020

नगर परिषदेत उपनगराध्यक्ष पदाला काहीच किंमत नसते. तरीही राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष असुनही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराने शिवसेनेच्या नगरसेवकांना फुस लावणे अत्यंत गैर आहे. असे होत राहिले, तर परस्परांतील संबंध बिघडतील.

सिन्नर : नगर परिषदेत उपनगराध्यक्ष पदाला काहीच किंमत नसते. तरीही राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष असुनही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराने शिवसेनेच्या नगरसेवकांना फुस लावणे अत्यंत गैर आहे. असे होत राहिले, तर परस्परांतील संबंध बिघडतील. त्यामुळे जे नगरसेवक फुटले त्या संदर्भात संपर्कप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांना कळविणार आहोत. जे फुटले त्यांच्यावर मी स्वतः पुढाकार घेऊन शिवसेना स्टाईल कारवाई करीन. त्यांना अपात्र ठरविले जाईल, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले. 

सिन्नर नगर परिषद उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी बंडखोरी केली. शिवसेनेचे सुजाता तेलंग, गीता वरंदळ, निरूपमा शिंदे, विजया बर्डे हे चार नगरसेवक फुटले. त्यांच्या मतदानामुळे बंडखोर बाळासाहेब उगले हे उपनगराध्यक्ष झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकाराने ही बंडखोरी झाली. त्यामुळे पारनेरची पुनरावृत्ती झाल्याने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा वाद उफाळून आला आहे. यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाल्याने फुटलेले नगरसेवक भुमिगत झाले. त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. त्यात श्री. करंजकर यांनी सर्व नगरसेवकांशी चर्चा करुन त्यांची भूमिका समजून घेतली. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती देणार असल्याचे सांगितले. 

यासंदर्भात श्री. करंजकर यांनी "सरकारनामा'ला माहिती दिली. ते म्हणाले, नगर परिषदेच्या कामकाज व राजकारणात उपनगराध्यक्ष पदाला फरासे महत्व नसते. चार महिन्यांपूर्वीच उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार होती. मात्र कोरोनामुळे ती लांबली होती. आता अचानक हा कार्यक्रम जाहीर झाला. याआधी सर्व समाजांना स्थान देऊन राजकीय समतोल म्हणून सर्वसंमतीने उमेदवार ठरला होता. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी यातील चार नगरसेवकांना फुस लावली. अशी फुस लावून फोडाफोडी करणे अत्यंत गैर आहे. घटक पक्षातील सदस्यच एकमेकांच्या सदस्यांत फाटाफटू करु लागले, तर परस्परांत समन्वय कसा राहणार?. त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. मात्र जे नगरसेवक आमिषाला बळी पडले, त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. याबाबत संपर्कप्रमुख, खसादार संजय राऊत यांसह वरिष्ठ नेत्यांना त्याबाबत माहिती देणार आहोत. या सगळ्यांवर गंभीर व शिवसेना स्टाईल कारवाई करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन. त्यांना अजिबात सहानुभुती मिळणार नाही. लवकरच त्याचे परिणाम सगळ्यांना दिसतील. 

या बैठकीस माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक नलीनी गाडे, प्रतिभा नरोटे, श्रीकांत जाधव, प्रमोद चोथे, सुजाता भगत, प्रणाली भाटजीरे-गोळेसर, शैलेश नाईक, गोविंद लोखंडे, सोमनाथ पावसे, ज्योति वामने, पंकज मोरे, रुपेश मुठे, स्विकृत नगरसेवक विजय जाधव, मंगलाताई शिंदे आदी उपस्थित होते. 
... 
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख