कोरोनामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी आंदोलनाला मारली दांडी! - Shivsena leaders absent in agitation due to Covid infection | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी आंदोलनाला मारली दांडी!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

वाढीव वीजबिलाविरोधात शहर भारतीय जनता पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन झाले. याला जशास तसे उत्तर म्हणून शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी कोरोना संसर्ग झाल्याने प्रमुख नेते यावेळी अनुपस्थित होते.

नाशिक : वाढीव वीजबिलाविरोधात शहर भारतीय जनता पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन झाले. याला जशास तसे उत्तर म्हणून शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शिवसेनेने केंद्र सरकारविरोधात आंदोलोनातून केलेले शक्तीप्रदर्शन व उत्साह विरोधकांना संदेश देऊन केला. मात्र कोरोना संसर्ग झाल्याने प्रमुख नेते यावेळी अनुपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इंधनाची दरवाढ कमी करण्याची मागणी केली. ‘नरेंद्र मोदी तेरा खेल, महंगा गॅस, महंगा तेल’, ‘पुरे झाला अच्छे दिनचा गाजावाजा, कुठे नेऊन ठेवला हिंदुस्तान माझा’, ‘महागाईने इंधन भडकले, अच्छे दिनचे गाजर कुठे अडकले’,‘गॅस, पेट्रोल, डिझेल पेटले, शेतकरी मात्र आयुष्यातून उठले’, ‘शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा शिवसेनेने दिल्या. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख कामगिरी बजावत जनतेला दिलासा दिला, तर केंद्रातील भाजप सरकारने इंधन व घरगुती गॅस सिंलिडरच्या दरात वाढ करून सर्वसामान्य जनतेला त्रस्त केल्याचा आरोप करण्यात आला. पेट्रोलचे दर शंभरीच्या टप्प्यात पोचल्याने केंद्र सरकारने महागाई वाढविल्याचा आरोप करण्यात आला. माजी आमदार वसंत गिते, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी महापौर नयना घोलप, माजी महानगरप्रमुख सचिन मराठे, कल्पना पांडे, सत्यभामा गाडेकर, संतोष गायकवाड आदी आंदोलनात सहभागी झाले होते. 

कोरोना नियम धाब्यावर 
भाजप व शिवसेनेला आंदोलनासाठी परवानगी देताना कोरोनाचे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन केले नाही. 

महानगरप्रमुखांची गैरहजेरी चर्चेत 
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर व ज्येष्ठ नेते सुनील बागूल यांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. मात्र, शिवसेनेचे आंदोलन तिघांच्या नेतृत्वाखाली घेण्याचे जाहीर झाले होते. श्री. करंजकर व बागूल आंदोलनाला उपस्थित राहिले नाहीत. श्री. बडगुजर यांनी स्थायी समितीच्या बैठकीला हजेरी लावली. आंदोलनस्थळी ते बैठक झाल्यानंतर उपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला. स्थायी समितीची बैठक असल्याने दोन तास आंदोलन उशिराने घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यापूर्वीच आंदोलन झाले, पण निवेदन देताना मी उपस्थित असल्याचे श्री. बडगुजर यांनी सांगितले.  
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख