नुकसानीचा धक्का; शिवसेना नेते अरुण मुसळेंची आत्महत्या  - shivsena leader Arun Musale sucide at Igatpuri | Politics Marathi News - Sarkarnama

नुकसानीचा धक्का; शिवसेना नेते अरुण मुसळेंची आत्महत्या 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

इगतपुरी तालुका शिवसेनेचे ज्येष्ठनेते आणि पंचायत समितीचे माजी सभापती अरुण दादा मुसळे (वय 53) यांनी सोमवारी नांदूरवैद्य (इगतपुरी) येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

अस्वली : इगतपुरी तालुका शिवसेनेचे ज्येष्ठनेते आणि पंचायत समितीचे माजी सभापती अरुण दादा मुसळे (वय 53) यांनी सोमवारी नांदूरवैद्य (इगतपुरी) येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

शेतीच्या उत्पादनात सातत्याने नुकसान होत होते. यंदा अवकाळी पावसाने त्यांची संपूर्ण भातशेती भुईसपाट झाली होती. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून ते विवंचनेत होते. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीदेखील त्यांचे भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. कदाचित यामुळेच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

दरम्यान, त्यांच्या आत्महत्येमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली. राजकीय कार्यकर्ते, नेत्यांत हळहळ व्यक्त होत आहे. वाडीवऱ्हे पोलिस याबाबत तपास करीत आहेत. अत्यंत मितभाषी आणि संयमी, अशी त्यांची ओळख होती. सुरवातीला त्यांनी नांदूरवैद्य ग्रामपंचायतीचे शिपाई म्हणून काम पाहिले. नंतरच्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तालुक्‍याच्या व परिसराच्या विविध प्रश्‍नांसाठी ते पाठपुरावा करीत असत. शिवसेनेचे एकनिष्ठ व आक्रमक कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात. तालुक्‍यात पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने सहभागी होत. 1997 मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत ते साकूर गणातून मोठ्या मताधिक्‍याने निवडून आले होते. पंचायत समितीवर शिवसेनेची एक हाती सत्ता आल्याने मार्च 1998 मध्ये त्यांची सभापतिपदी निवड झाली. त्यानंतर ते सलग पाच वर्षे नांदूरवैद्यचे सरपंचही होते. 

वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी येऊन रितसर पंचनामा केला. घोटी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, माजी उपसभापती रमेश जाधव, राजू दिवटे, विठोबा दिवटे आदींसह तालुक्‍यातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख